fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsPUNE

पुण्यात रंगलाय आंतरराष्ट्रीय पेन महोत्सव; जुन्या काळातील लेखन सामग्री ठरतेय विशेष आकर्षण

पुणे : भारताकडून  सध्या जगात सर्वात जास्त पेन रिफिल आणि प्लास्टिक पेनची निर्यात केली जात आहे. या क्षेत्रात चीनला पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर आज ‘रायटिंग वंडर्स’तर्फे आंतराष्ट्रीय फाउंटन पेन महोत्सवाचे आयोजन करण्यात आला आहे. याचे उद्घाटन शनिवारी ‘विलियम पेन’चे व्यवस्थापकीय संचालक निखील रंजन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पटना, बिहार येथील पेन संग्राहक युसुफ मन्सूर, पेनचे चाहते आणि वास्तुविशारद यशवंत पिटकर, व्हीनस ट्रेडर्स’चे सुरेंद्र करमचंदानी हे उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती भारतरत्न ‘डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम सिग्नेचर फाउंटन पेन’चे अनावरण करण्यात आले.

सेनापती बापट रस्ता येथील हॉटेल जे. डब्ल्यू मेरीएट येथे  आयोजित या पेन महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, महोत्सवाची वेळ रविवारी, ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ असणार आहे. महोत्सवात पेनाच्या चाहत्यांना जगभरातील तब्बल ७० हून अधिक ब्रँड’चे विविध प्रकारातील ‘प्रीमयम’ पेन पाहता येणार आहेत.

‘विलियम पेन’चे व्यवस्थापकीय संचालक निखील रंजन म्हणाले, “ पेन उद्योगाचा शिक्षण क्षेत्राशी अगदी जवळचा संबंध आहे. भारतात शिक्षण घेणाऱ्या तरुण वर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचबरोबर भेटवस्तू म्हणून पेन’ला सर्वाधिक पसंती दिली जाते. तर पेनांचा संग्रह करणारे अनेक चाहते आपल्याकडे आहेत. त्यामुळेच पेन उद्योगासाठी भारत एक मोठी बाजारपेठ ठरत आहे. तसेच अलीकडील काळात भारताच्या निर्यात क्षमतेतही मोठ्या प्रमाणात वाढ झालीये आहे.’’

या पेन महोत्सवात तब्बल पाच लाख रुपये किमतीचा ‘मोन्टेग्राप्पा बॅटमॅन एडिशन’ हा प्रीमियम पेन पाहण्याची संधी पेन चाहत्यांना मिळणार आहे. या पेनचे वैशिष्ट्य म्हणजे टीटानियम धातूपासून हा पेन बनविण्यात आला असून, याला सोन्याची नीब बसविण्यात आली आहे. बॅटमॅन या लोकप्रिय भूमिकेपासून प्रेरित होत, या पेनाचे डिझाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्टेक्स कंपनीतर्फे तयार करण्यात आलेला मुघल कला आणि वास्तुशास्त्रावर आधारित ‘ अष्टकोन’ हा २२ कॅरट सोन्याचा मुलामा असलेला पेन आणि शाई बॉटल देखील महोत्सवात पाहता येणार आहे.

Leave a Reply

%d