Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘श्रध्दा सुमन’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कल या संस्थेच्या वतीने तबलासम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत श्रध्दा सुमन या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार ३ व रविवार ४ डिसेंबर रोजी कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सदर कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची वेळ दोन्ही दिवस सायंकाळी ६ वाजता अशी असेल. कार्यक्रमासाठी प्रवेश सशुल्क असणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

आपले गुरु पं. किशन महाराज यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने मागील २८ वर्षे अरविंद कुमार आझाद हे ‘श्रद्धा सुमन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करीत असतात. सदर वर्ष हे पं. किशन महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष असून प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून आम्ही आदरांजली वाहणार असल्याचे आझाद यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात सनई वादक डॉ. प्रमोद गायकवाड आणि त्यांच्या कन्या नम्रता गायकवाड यांच्या सनईवादनाने होईल. डॉ. प्रमोद गायकवाड हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सनईसम्राट शंकरराव गायकवाड यांचे नातू तर सुरमणी पंडित प्रभाशंकर गायकवाड यांचे पुत्र आहेत. तर नम्रता गायकवाड या आपल्या परिवारातील चौथ्या पिढीतील सनई वादक आहेत. यानंतर प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं. स्वपन चौधुरी यांचे सोलो तबलावादन होईल. पं. चौधुरी हे लखनौ घराण्याचे पं. संतोषकुमार बिस्वास यांचे शिष्य असून त्याना पं. धर्मनाथ मिश्रा हे संवादिनीवर साथसंगत  करतील.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ डिसेंबर रोजी पं. रितेश व पं. रजनिश मिश्रा यांचे गायन होणार आहे. हे दोघेही बनारस घराण्याचे प्रसिद्ध गायक पद्मभूषण पं. राजन मिश्रा यांचे पुत्र तर पं. साजन मिश्रा यांचे पुतणे आहेत. या दोघांना सुयोग कुंडलकर हे संवादिनी तर पं. अरविंदकुमार आझाद हे तबल्यावर साथसांगत करतील. पं. अरविंदकुमार आझाद हे पद्मविभूषण पं. किशन महाराज यांचे ज्येष्ठ शिष्य आहेत.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध तबलावादक पं. कुमार बोस यांचे सोलो तबलावादन होईल. त्यांना पं. धर्मनाथ मिश्रा हे संवादिनीवर साथसंगत करतील. सदर कार्यक्रमाचे निवेदन डॉ. सुनिल देवधर हे करणार आहेत.

कार्यक्रमासाठी प्रवेश सशुल्क असणार असून. प्रतिदिवस रु. १०००, ५००,३०० असे तिकिटाचे दर असतील. कार्यक्रमाची तिकिटे कोथरूड येथील यशवंराव चव्हाण नाट्यगृह तसेच टिळक रस्ता येथील टिळक स्मारक येथे उपलब्ध आहेत. शिवाय बुर्कीगसाठी ९८२३११२४१२ / ९८९०१३८८९६ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading