Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यातील 24 महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे नगरविकास विभागाचे आदेश


मुंबई : मुंबईसह राज्यातील 24 महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने आज जारी केले आहेत. नवी मुंबई, मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी महापालिकांची मुदत संपली आहे. महापालिकांची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे, अशा सर्व महापालिकांनी निवडणुकीसाठी प्रभाग संख्या / रचना निश्चित करावेत, असे आदेश नगरविकास खात्याचे आहेत. त्यामुळे लवकरच सर्व महापालिकांच्या निवडणुका घेण्यात येतील, असे संकेत यातून मिळत आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्या वाढीच्या आधारावर सरासरी प्रभाग/ वॉर्ड संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबईसह राज्यातील बहुतेक सर्व महापालिकांत 9 नगरसेवकांची वाढ झाली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारचा निर्णय नव्या सरकारने बदलला होता. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. येत्या 28 नोव्हेंबर रोजी याबाबत सुनावणी होणार आहे.

मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांच्या निवडणुका कधी होणार याचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत. तर दुसरीकडे, राजकीय नेतेही राज्यातील भाजप व शिंदे गटाचे सरकार लवकरच कोसळेल व मध्यावधी निवडणुका लागतील, अशी भाकिते करीत आहेत. अशातच मंगळवारी नगरविकास खात्याच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी – छापवाले यांनी सर्व महापालिका आयुक्तांसाठी तातडीने एक पत्रक जारी केले असून त्यामध्ये महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जनगणनेनुसार प्रभागांची संख्या/ रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे आदेश दिले आहेत.मुंबई महापालिका अधिनियम 1888 व महानगरपालिका अधिनियम 1949मध्ये संदर्भीय केलेल्या तरतूदीप्रमाणे मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महापालिकांची आगामी निवडणूक घेण्यासाठी प्रभागांची संख्या/ रचना निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, संभाजीनगर नांदेड- वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा – भाईंदर या 23 महापालिकांची मुदत संपली आहे. तेथे सध्या प्रशासक कारभार पाहत आहेत. तर नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी महापालिकेची प्रथमच निवडणूक होईल. त्यामुळे सध्या राज्यातील 28 पैकी 24 महापालिकांसाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading