सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान
दहा जागांसाठी ७१ केंद्रांवर होणार मतदान: निवडणूक प्रतिनिधी मतनोंदणी प्रक्रियेसाठी रवाना
पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी आज (रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२) सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मतदान प्रक्रियेची सर्व तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली असून मत पेट्यांसह निवडणूक प्रतिनिधी आपापल्या केंद्रावर शनिवारी रवाना झाले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पदवीधरांमधून दहा उमेदवार अधिसभेवर निवडून देण्यासाठी ही निवडणूक होत आहे.
पुणे, अहमदनगर आणि नाशिक व सिल्वासा येथे विद्यापीठातील २०० हून अधिक निवडणूक प्रतिनिधी, केंद्र निरीक्षकांच्या देखरेखीखाली तसेच पोलिसांच्या सुरक्षेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण, तसेच आवश्यक त्या सर्व प्रकारची खबरदारी विद्यापीठाकडून घेण्यात आली आहे. दरम्यान मतदान नोंदणी दरम्यान काही अनुचित प्रकार घडण्यास कडक कारवाई केली जाईल असे विद्यापीठ निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सकाळी १० ते शेवटचे मतदान सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व केंद्रांवर ही मतदान नोंदणी प्रक्रिया होणार आहे. सर्वांनी या निवडणुकीत सहभागी होत लोकशाही अधिक बळकट करावी असा संदेश कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी दिला आहे.
या निवडणुका निष्पक्ष व पारदर्शी होण्यासाठी सर्व तयारी विद्यापीठाने पूर्ण केली असून यावेळी विक्रमी मतदान होण्याची अपेक्षा आहे. पदवीधरांनी निर्भिडपणे मतदान करावे.
- डॉ.प्रफुल्ल पवार, कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी
एकूण दहा जागांसाठी ३७ उमेदवारांचे अर्ज
पदवीधर मतदार संघातून अधिसभेच्या दहा जागांसाठी एकूण ३७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये पाच खुल्या जागांसाठी १८ उमेदवार, एका अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पाच उमेदवार, एका अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेसाठी ४ उमेदवार, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी ४ उमेदवार, इतर मागास प्रवर्गासाठी एका जागेसाठी चार उमेदवार तर महिला प्रवर्ग एका जागेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
मतदान कोठे?
पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर, नाशिक, सिल्वासा
मतदान केंद्रांची यादी कोठे पाहता येईल?
http://www.unipune.ac.in या संकेस्थळावर पाहता येईल.
किती जागांसाठी मतदान?
१० जागांसाठी ३७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
किती पदवीधरांची नोंदणी?
८८ हजार ८३१ पदवीधर
एकूण मतदान केंद्र – ७१
पुणे शहर २६
पुणे ग्रामीण १०
नाशिक १९
अहमदनगर १५
सिल्वासा १
निवडणुकीसाठी त्रिस्तरीय यंत्रणा
विभागीय निरीक्षक- ४
केंद्र निरीक्षक – ७४
बूथ प्रतिनिधी – ११४
पोलिस कर्मचारी- १२०, सुरक्षारक्षक- ५००
