पुण्यात सुरू होणार डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे पूर्णवेळ मधुमेह मुक्ती व समुपदेशन केंद्र
पुणे : स्थूलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून असोसिएशन फॉर डायबेटिस अँड ओबेसिटी रिव्हर्सल (अडोर) संस्थेच्या माध्यमातून डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे पूर्णवेळ मधुमेह मुक्ती व समुपदेशन केंद्र पुण्यात सुरु होणार आहे. सदर केंद्रासाठी इन्फोसिस फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले असून यासंदर्भातील घोषणा दीक्षित जीवनशैलीचे प्रणेते सुप्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने या केंद्राची घोषणा आम्ही करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. इन्फोसिसचे उपाध्यक्ष प्रवीण कुलकर्णी हे देखील यावेळी उपस्थित होते. पुण्यासोबतच नागपूर येथे देखील अशाच प्रकारचे केंद्र सुरु होणार असल्याचेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
येत्या २१ नोव्हेंबर पासून पुणे तर १ डिसेंबरपासून नागपूर केंद्र कार्यरत होणार असून सर्व नागरिकांसाठी विनामूल्य समुपदेशन या केंद्राच्या मार्फत उपलब्ध असेल.
यावेळी बोलताना डॉ. दीक्षित म्हणाले, ‘आजवर स्वयंसेवक, शिबिरे, व्याख्याने, कार्यक्रम व इतर समाज माध्यमे यांद्वारे आमचे काम अखंडपणे सुरु आहे. २०१३ सालापासून सुरु असलेल्या आमच्या स्थूलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून आम्ही आता हे पूर्णवेळ केंद्र सुरू करीत असून याद्वारे रुग्णाची संपूर्ण माहिती संकलित करून यानंतर त्यांना मधुमेह मुक्ती व स्थूलत्व यांविषशी समुपदेशन करणे हा आमचा उद्देश आहे.” या केंद्रात वैयक्तिक समुपदेशन व मधुमेह तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन रुग्णांना मिळणार असून हे सर्व विनामूल्य उपलब्ध असेल. वेळोवेळी होणारा पाठपुरावा हे आमच्या केंद्राचे वैशिष्ट्य असेल असेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
रुग्णांची माहिती संकलित करण्यासाठी व मधुमेह मुक्ती या विषयातील पुढील संशोधनासाठी या केंद्राचा फायदा होईल असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
नजीकच्या भविष्यात पुणे व नागपूरसोबतच इतर मुख्य शहरांत देखील पूर्णवेळ केंद्रे सुरु करीत रुग्णांना मार्गदर्शन करण्याचा आमचा मानस आहे. शिवाय तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यक्रम, रुग्णांना आलेले अनुभव एकमेकांशी शेअर करणे आदी माध्यमातून आम्ही जनजागृती करणार असल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल शिवसागर शेजारच्या गल्लीत दुर्गाशंकर इमारतीमध्ये रविवार वगळता सायं. ५ ते रात्री ९ दरम्यान हे केंद्र सुरु असणार आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने २१ ते ३० नोव्हेंबर दरम्यान या केंद्रावर एचबीए १ सी ही रक्त चाचणी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी केंद्रावर येऊन नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सदर नावनोंदणी ही गुरुवार दि. १७ नोव्हेंबर पासून सायं ५ ते ९ या वेळेत करता येणार आहे.
