आव्हाडांनी मला दोन्ही हातांनी पकडून ढकललं – रिदा राशिद यांचा आरोप
मुंबई : भाजप पदाधिकारी रिदा राशिद यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणावरुन राज्यात राजकारण पेटलं आहे. आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे टि्वट केलं आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या वादावर रिदा राशीद यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेबाबत आपबित्ती सांगितली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसची हीच परंपरा आहे का,” असा सवाल रिदा राशीद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंना केला आहे. आव्हाडांनी मला जोरात पकडून धक्का देत गर्दीत ढकल्याचा आरोपही रीदा राशीद यांनी पत्रकार परिषदेत केला. “जितेंद्र आव्हाड यांनी मला दोन्ही हातांनी पकडून पुरुषांच्या अंगावर ढकललं,” असे त्या म्हणाल्या.
रिदा राशीद म्हणाले,”मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला उभे होते. त्यानंतर खूप गर्दी झाली. उद्घाटनावेळी खूप गर्दी होती. उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री जायला निघाले. त्यांना भेटता यावं याकरता मी पुढे निघाले. त्यांच्या पीएंकडून मी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. सगळेच जायला निघाले. तेवढ्यात मुख्यमंत्री गाडीत जाऊन बसले. म्हणून मीही गाडीला चिकटूनच गाडीच्या दरवाजाजवळ जात होते. तेवढ्यात समोर आमदारसाहेब दिसले. ते स्थानिक आमदार असल्याने मी त्यांच्याकडे बघून स्मितहास्य दिलं. पण त्यांनी तू इथे काय करतेयस असं म्हणून मला दोन्ही हाताने बाजूला ढकललं. त्यांनी जिथे ढकललं तिथे पुरूष होते. त्यांनी मला अक्षरशः पुरुषांच्या अंगावर ढकललं,”
“खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगावे की जे माझ्यासोबत झाले हीच त्यांच्या पक्षाची परंपरा आहे का?, असेच महिलांना ढकलून त्यांच्या पक्षात बाजूला सारले जाते का? हीच शिकवण राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिली जात आहे का, असा सवालही राशीद यांनी उपस्थित केला. यावर महाराष्ट्र महिला आयोग काय प्रतिक्रिया देते याकडे माझे लक्ष आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.
