डॉ. स्वाती व धनंजय दैठणकर दाम्पत्याने उलगडला आपल्या सांगीतिक सहजीवनाचा प्रवास
सहजीवनासोबतच कलेच्या क्षेत्रातील एकत्र मुशाफिरी अनुभविणा-या डॉ. स्वाती व धनंजय दैठणकर या दाम्पत्याच्या सांगीतिक सहजीवनाचा प्रवास या कार्यक्रमामधून आज टिळक स्मारक मंदिर येथे पुणेकरांनी अनुभविला. नीरजा आपटे यांनी या वेळी दोघांची प्रकट मुलाखत घेतली. शिवाय डॉ. स्वाती दैठणकर यांनी मागील २२ वर्षांत एकत्र केलेल्या तब्बल १५ प्रकल्पांमधील काही निवडक सादरीकरण करीत एका अनोख्या कार्यक्रमाची अनुभूती उपस्थितांना दिली.
डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील, ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, सावनी शेंडे, शिल्पा पुणतांबेकर, या प्रकल्पांच्या निमित्ताने जोडले गेलेले अनेक कलाकार, तंत्रज्ञ यावेळी आवर्जून उपस्थित होते.
स्वातीच्या हट्टाखातर आणि विशेष म्हणजे तिच्या संकल्पनेवर आधारित प्रकल्पांद्वारे खरे तर माझा संगीत दिग्दर्शनाचा प्रवास सुरु झाला. अनेक गोष्टी या दरम्यान शिकता आल्या. अनेक चांगले गायक, सहकलाकार, तंत्रज्ञ यांबरोबर पोटभरून काम करण्याची संधी मिळाली, याचा आनंद असल्याचे डॉ. धनंजय दैठणकर यांनी आवर्जून नमूद केले.
मूळची मुंबईची असलेली मी लग्नानंतर पुण्यात आले. दैठणकरांच्या घरात माझ्या कलेला मानाचे स्थान तर मिळालेच शिवाय पुण्याने एक नवी ओळख दिली. आम्हा दोघांचे सहजीवन सुरू असताना कलेतील सहप्रवास खूप काही शिकवून आणि देऊन गेला. यामधून ख-या अर्थाने एक कलाकार म्हणून एकमेकांच्या साथीने आम्ही घडत गेलो. वादाचे अनेक प्रसंग या दरम्यान आले मात्र आम्ही ते संवादात बदलून वाटचाल करीत राहिलो, असे सांगत डॉ. स्वाती दैठणकर यांनी २२ वर्षांचे सहजीवन आणि यादरम्यान केलेल्या १५ प्रकल्पांचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
आज आमची दोन्ही मुले आमच्या पावलांवर पाऊल ठेवत या क्षेत्रात कार्यरत आहेत याचा आम्हाला आनंद आहे, असेही त्या म्हणाल्या.
डॉ. स्वाती यांनी गणेशवंदनेने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. मध्येमध्ये मुलाखत आणि त्या अनुशंगाने सादरीकरण असा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी या दोघांनी एकत्रितपणे केलेले ‘राजस सुकुमार’, “सूर श्याम रंग’, ‘पद्मिनी’, ‘तेजोनिधी’, ‘नृत्यबानी’ या प्रकल्पांतील काही रचना उपस्थितांसमोर सादर झाल्या.
आजचा ‘चालविसी हाती धरोनिया…’ या कार्यक्रमाचा प्रयोग हा शुभारंभाचा प्रयोग असून यानंतर पुणे, मुंबई, नाशिक आणि अमेरिकेतही याचे प्रयोग होणार असल्याची माहितीही डॉ. स्वाती यांनी दिली.
या कार्यक्रमात डॉ. स्वाती दैठणकर यांनी त्यांच्या ज्येष्ठ शिष्या प्राजक्ता, गौरी, श्रुती, तन्वी, साधना, राजलक्ष्मी आणि सई यांसोबत सादरीकरण केले. कार्यक्रमाची प्रकाशयोजना तेजस देवधर यांची होती.
