खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात; मुलगा अमोल मात्र ठाकरेंसोबतच
मुंबई:आधीच आमदार आणि खासदारांनी साथ सोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना आणखी एक झटका बसला आहे. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.गजानन कीर्तिकर हे शिवसेनेतील वरिष्ठ आणि दिग्गज नेते मानले जातात.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकरांची भेट घेतली होती. त्यामुळे कीर्तिकर शिंदे गटात जाणार अशा चर्चा तेव्हापासून रंगल्या होत्या. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीवरील नाराजी कीर्तिकर यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली आहे. मात्र दुसरीकडे अनेकदा कीर्तिकरांनी शिंदेंचं तोंड भरून कौतुकही केलं होत. त्यामुळे कीर्तिकर ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत जाणार का? यावर तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर आज त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
दरम्यान, खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल याने शिंदे गटात जाण्याचा निर्णय वडिलांचा वैयक्तिक आहे, असे सांगत मी ठाकरे यांच्या सोबतच असून आदित्य ठाकरे यांना शेवटपर्यंत साथ देणार असल्याचे सांगितले.
