Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रमाला रसिकांचा तुडुंब प्रतिसाद  

पुणे : गायक अरुण दाते यांच्या लोकप्रिय गाण्यांचे दर्जेदार सादरीकरण, सोबतीला अतुल अरुण दाते यांनी सांगितलेले विविध किस्से आठवणी, त्याचबरोबर प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांकडून होणारी ‘वन्स मोअर’ची मागणी आणि गाण्यांच्या सादरीकरणाला मिळालेला टाळ्यांचा उदंड प्रतिसाद… अशा उत्साही वातावरणात ‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रमाचा प्रयोग संपन्न झाला.

‘शुक्रतारा मंदवारा’ या अत्यंत लोकप्रिय अशा गाण्याच्या हिरक महोत्सवही वर्षाचे औचित्य साधत अतुल अरुण दाते आणि ड्रीम्स रीडेव्हलप्ड यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात ‘नवा शुक्रतारा’ या अरुण दाते यांच्या लोकप्रिय गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी ड्रीम्स रीडेव्हलप्ड’चे संस्थापक संचालक सी ए एस. लक्ष्मीनारायणन आणि अॅब्सोल्युट व्हिजन आय क्लिनिक अँड लेसिक सेंटरच्या संस्थापिका व संचालिका डॉ. आश्विनी महाजन -गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवा शुक्रतारा कार्यक्रमाचा हा ६९ वा प्रयोग होता. यामध्ये गायक श्री. मंदार आपटे, सौ.गायिका पल्लवी पारगावकर, व सौ. वर्षा जोशी यांनी विविध गाणी सादर केली. अतुल दाते यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले, तसेच अरुण दाते यांच्याशी संबंधित काही विशेष आठवणी आणि किस्से सांगितले. प्रमुख कलाकारांना सागर टेमघरे, अमेय ठाकूरदेसाई, प्रसन्ना बाम, अमित कुंटे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन प्रशांत कांबळे यांनी केले, तर सायली सोनटक्के यांनी दृकश्राव्य व्यवस्था सांभाळली.

कार्यक्रमाची सुरवात मंदार आपटे यांनी सादर केलेल्या ‘श्रीराम जयराम’ या भजनाने झाली. त्यानंतर ‘स्वरगंगेच्या काठावरती’, दिवस तुझे हे फुलायचे’ ही गीते सादर झाली. त्यानंतर ‘संधिकाली या अशा’, ‘ डोळे कशासाठी’, पहिलीच भेट झाली’ ही युगुल गीते, लावणी – लावणा, ‘रसिका मी कैसे गाऊ गीत’ हे सोलो गीत सादर करण्यात आले. मंदार यांनी सादर केलेल्या ‘कितीदा नव्याने तुला आठवावे’ या गीताला रसिकांची विशेष दाद मिळाली. कार्यक्रमाची सांगता ‘शुक्रतारा- मंदवारा’ या गीत सादरीकरणाने झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading