संजय राऊत मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांनी त्यांचे कडकडून मिठी मारत स्वागत केले
मुंबई : तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत ‘मातोश्री’वर ठाकरे कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल झाले.
संजय राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे स्वत: उपस्थित होते. संजय राऊत मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांचे कडकडून मिठी मारत स्वागत केले. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर कदाचित पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्याने आपल्या पक्षातील नेत्याचे स्वागत केले असावे.
आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण त्यांनी गद्दारी केली नाही असेही आदित्य यांनी म्हटले. संजय राऊत हे पळून गेले नाहीत. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं आहे. जे डरपोक होते ते पळून गेले. मी आता तेच सांगितलं जे कोणी सत्तेविरोधात आवाज उठवतात, सरकारविरोधात बोललं की दबावतंत्र वापरलं जातं. आज राजकीय लोकांवर कारवाई होते, उद्या ज्यांना ते एचएमव्ही बोलतात त्यांच्यावरही कारवाई होईल ही देशासाठी धोक्याची घंटा असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले
