पोलीस खेळांमध्ये कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न करणार – महाराष्ट्र केसरी विजय चौधरी
पुणे : सलग तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेतेपद मिळवणारे सहायक पोलिस आयुक्त कुस्तीगीर विजय चौधरी हे आगामी ऑल इंडिया पोलीस गेम्स स्पर्धेत कुस्ती खेळासाठी महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज होत असून, यंदाच्या पोलीस खेळांमध्ये कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. ही स्पर्धा १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत वानवडी येथील एसआरपीएफ ग्रुप १ येथे होणार आहे.
२०१८ साली राजस्थान मध्ये झालेल्या स्पर्धेत चौधरी यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली होती. यंदाच्या स्पर्धेत त्यापेक्षाही चांगली कामगिरी करण्याचा मानस चौधरी व त्यांचे मार्गदर्शक रोहित पटेल यांनी व्यक्त केला आहे.
चौधरी यांनी २०१४,२०१५ आणि २०१६ अशा सलग तीन वर्षामध्ये अतिशय प्रतिष्ठित अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. हा मान मिळविणारे ते दुसरे कुस्तीपटू आहेत. मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव सायगाव येथील रहिवासी असलेले चौधरी हे सध्या पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेत स्वारगेट विभागात सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आगामी पोलीस खेळांमध्ये ते १२५ किलो वजन गटात खेळणार असून, हिंद केसरी रोहित पटेल यांच्याकडून ते खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत.
स्पर्धेच्या तयारीबाबत चौधरी म्हणाले, “ आगामी स्पर्धेत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील कुस्तीपटूंचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी मी प्रशिक्षणावर अधिक भर देत आहे. माझे काम सांभाळून मी हे प्राशिक्षण घेत असून, या प्रशिक्षणासाठी मला पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात सकाळी तीन तास आणि संध्याकाळी सुमारे दोन तास प्रशिक्षण सुरु असते. सकाळच्या प्रशिक्षणादरम्यान, प्रतिस्पर्ध्यावर मात कशी करायची याचा सराव करतो. तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासोबतच पॉवर वर्क’वर देखील भर देत आहे. तर संध्याकाळच्या वेळेत मॅट सराव आणि योग अभ्यास करतो.’’
