महापालिका निवडणुक : राज ठाकरे पुण्यात 3500 राजदूत नेमणार
पुणे:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील औद्योगिक प्रकल्प गुजरातला जाण्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता जोमाने कामाला लागल्याचं चित्र आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत पदाधिकारी आणि पक्षाच्या सचिवांची बैठक घेतल्याची बातमी ताजी असताना पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात मनसे 3500 राजदूत नेमणार आहे. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरीक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना आणली आहे. या उपक्रमातून मनसे पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.
मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी शहरातील विविध भागातील सर्व पदाधिकाऱ्यांना राजदूत नेमण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पुण्यात मनसे संघटनात्मक पातळीवर विभागनिहाय नेमणुका करणार आहे. दर एक हजार मतदारामागे एक राजदूत अशी नेमणूक करण्यात येणार आहे.
पुण्यात लवकरच राजदूतांची नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यात मेळावा होईल. या मेळाव्यानंतर लगेच आगामी पुण्याच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भव्य सभा देखील घेतली जाण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे साधारण दोन महिन्यांनी पुण्याचा दौरा करतात. पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या बैठका घेतात. पक्षाला पुण्यात पोषक वातावरण असल्याने पुण्यात पुन्हा पाय रोवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. शहर संघटनेत मतभेद असले तरी संघटना एकत्र ठेवण्यास अद्यापर्यंत तरी त्यांना यश आले आहे. या पुढचा काळ निवडणुकांचा आहे. महापालिका निवडणुकीनंतर, लोकसभा व विधासभेची निवडणूक आहे. त्यामुळे संघटना बळकट करण्यावर ठाकरे यांचा भर दिसत आहे.
