राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारत जोडो यात्रेची गरज – राहुल डंबाळे
पुणे : वाढत्या जातीय व धार्मिक ध्रुवीकरणाच्या विरोधात प्रेम व सदभावणाची भूमिका मांडणाऱ्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला रिपब्लिकन युवा मोर्चा व अन्य धर्मनिरपेक्ष संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच १० ऑक्टोबर नंतर हजारो कार्यकर्ते या यात्रेत आपला सहभाग दर्शवणार असून पुण्यातून २०० लोकांची टिम या यात्रेत ५ दिवसासाठी सहभागी होणार आहे. अशी माहिती राहुल डंबाळे यांनी दिली.
कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून ही यात्रा पुढील आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होणार आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व सामाजिक न्यायाची शिकवण देणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकर विचारांची कर्मभूमी असणाऱ्या राज्यातील जनतेने पक्ष संघटनेचा व नेतृत्वाचा भेद विसरून सर्व तऱ्हेचे धार्मिक व जातीय ध्रुवीकरणाला विरोध करून देशात राहणारा प्रत्येक नागरिक हा भारताचा अविभाज्य घटक असून सर्वांनीच एकमेकांशी प्रेम व सदाचाराने वागावे अशी भूमिका मांडणाऱ्या भारत जोडो तिला पाठिंबा देण्याची गरज आहे. या यात्रेतून देशाचे सार्वभौमत्व व राष्ट्रीय एकात्मता जोडली जाणार आहे. त्यामुळे रिपब्लिकन युवा मोर्चा ने या यात्रेस पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असून यास अन्य धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांनीही सकारात्मक पाठिंबा दर्शवला आहे.
पुणे येथील अल्पबचत भवन येथे रिपब्लिकन युवा मोर्चा चे नेते राहुल डंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली जोडो यात्रेला पाठिंबा दर्शवण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत केदारी यांनी या यात्रेला पाठिंबा दर्शवताना ‘राहुल गांधी यांनी आगामी काळात अल्पसंख्यांक समुदायाच्या प्रश्नांना वाचा फोडणारी भूमिका घ्यावी तसेच अल्पसंख्यांकाच्या खऱ्या प्रतिनिधींना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करत सद्भावना व प्रेम व्यक्त करणाऱ्या या यात्रेस राज्यातील ख्रिस्ती समाजाचाही पाठिंबाच राहणार आहे व त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न आम्ही करू’ असे मत व्यक्त केले.
‘भाजपच्या फॅसिस्ट विचारसरणीच्या विरोधात सर्व धर्मनिरपेक्ष पुरोगामी लोक एकवटत असताना त्यांना सोबत घेऊन पुढे चालण्याची तयारी काँग्रेस पक्षाने करणे आवश्यक आहे. परंतु राज्यातील नेतृत्व हे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला केवळ एक टास्क म्हणूनच पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. वास्तविक त्यांनी राहुल गांधी यांचा सर्व समावेशकतेचा विचार लोकांपर्यंत घेऊन जाणे व या विचारावर काम करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. अनेक पक्ष संघटना यात्रेसोबत जोडण्यास इच्छुक असून काँग्रेसने त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. या यात्रेला आंबेडकरी समुदायाचा पाठिंबा मिळविण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही अधिक प्रयत्न करत आहोत’. अशी भूमिका रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सुवर्णा डंबाळे यांनी मांडली.
धार्मिक अल्पसंख्यांक समुदायात दहशतीचे वातावरण तयार करून त्यांना विकासाच्या प्रवाहाच्या बाहेर ठेवण्याचे षडयंत्र भाजपा व मोदी सरकार करत आहे. धर्मांतर बंदी कायदा तसेच समान नागरी कायदा या मुद्द्यांना अकारण पुढे करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील बिघडलेले वातावरण दुरूस्त करण्यासाठी अल्पसंख्यांक समुदायातील लोक या यात्रेसोबत चालण्यास तयार आहेत. परंतु काँग्रेस पक्षाने या मुद्द्यावर ठाम भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही प्रतिपादन अपना वतन संघटनेचे नेते सिद्दीक शेख यांनी केले. दरम्यान रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून भारत जोडो यात्रेसाठी काँग्रेसेतर धर्मनिरपेक्ष पुरोगामी कार्यकर्त्यांचे व्यापक जनमत राहुल डंबाळे यांनी तयार केले असून त्याचा फायदा निश्चितच यात्रेला होईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आनंद वैराट यांनी केली.
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला धर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांचा मिळणारा पाठिंबा महत्त्वपूर्ण असून या बैठकीबाबतचा संपूर्ण तपशील पक्षश्रेष्ठींकडे सादर करणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुजित यादव यांनी सांगितले. बैठकीत रिपब्लिकन युवा मोर्चाचे किरण सोनवणे अॅड. प्रविण पटेकर, अजय लोंढे, प्रतीक भवार, लढा युथ संघटनेचे प्रमोद शिरसागर, काँग्रेसचे करीम शेख आधी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक अजय लोंढे यांनी केले.
