Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘कांतारा’ला दणका ! ; ‘वराह रूपम’गाणे वापरण्यास कोर्टाची मनाई…

‘कांतारा’ चित्रपटाची भुरळ ही सर्वांनाच पडली आहे. या चित्रपटाने अनेक विक्रमी रेकॉर्ड केले आहेत. मात्र आता हा चित्रपट वादाच्या भोव-यात अडकला आहे. कर्नाटकच्या एका ग्रामीण भागामध्ये भूतकोला नावाची एक प्रथा आहे. ‘कांतारा’मध्ये ती दाखवण्यात आली आहे. त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. त्याआधी ‘कांतारा’ चित्रपटातील ‘वराह रूपम’गाण्याच्या ओळी चोरल्याचा आरोप ‘थैक्कुडम ब्रिज’ या लोकप्रिय बँडने केला होता आणि कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती.

या पार्श्वभूमीवर कोझिकोड जिल्हा सत्र न्यायालयाने ‘कांतारा’मधील ‘वराह रूपम’ हे गाणे वापरण्यास अंतरिम मनाई आदेश ठोठावला आहे.ओटीटी प्लॅटफॉर्म, संगीत चॅनेल, वेबसाईट आणि यूट्यूब याशिवाय निर्माता, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शकासह चित्रपटाच्या निर्मात्यांना थैक्कुडम ब्रिज बँडच्या परवानगीशिवाय गाणे वापरण्यास या आदेशाअंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.

या बँडचे प्रतिनिधित्व सतीश मूर्ती यांनी केले, जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. ‘वराह रूपम’ हे गाणे थैक्कुडम ब्रिज बँडच्या लोकप्रिय क्रमांक ‘नवरसम’ सारखेच आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आला आहे.

दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी नुकतेच कोची येथे कॉपीराईटचे उल्लंघन केले नसल्याचा दावा करत या आरोपांचे खंडन केले होते. मात्र, ‘नवरसम’ गाणे माहीत असून त्यातून प्रेरित झाल्याचे त्यांनी मान्य केले होते. ‘वराह रूपम’ हे गाणे साई विघ्नेश यांनी गायिले असून बी. अजनीश लोकनाथ यांनी संगीतबद्ध केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading