Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

फुकट जाहिरात बाजी: माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे:जाहिरात कंपनीची परवानगी न घेता कंपनीच्या जाहिरात फलकावर वाढदिवसाची जाहिरातबाजी करणे माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्या अंगलट आले आहे. जाहिरात फलकाचा वापर केल्याने त्याचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या जाहिरात कंपनीतील अधिकाऱ्याला मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी नगरसेवक पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जाहिरात कंपनीचे अधिकारी अतुल माधव संगमनेरकर (वय ५५, रा. रास्ता पेठ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर या प्रकरणी हाजी गफूर पठाण (वय ४५, रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिठानगर येथील अशोक म्युज सोसायटीच्या परिसरातील चौकात ही घटना घडली. संगमनेरकर हे कॅप्शन आऊटडोअर ॲडव्हरटायजिंग या कंपनीत अधिकारी आहेत कंपनीचे कोंढवा परिसरातील जाहिरात फलकावर हाजी गफूर पठाण यांनी परवानगी न घेता स्वत:च्या वाढदिवसाचे फलक लावले होते. त्यानंतर कंपनीने पठाण यांच्या कार्यालयात जाहिरातीचे बिल पाठविले होते. बिलाच्या रक्कमेसाठी संगमनेरकर पठाण यांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा पठाण यांनी संगमनेरकर यांना शिवीगाळ करुन लाथ मारली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक शिळीमकर तपास करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading