महिला वकिलांविषयीची ‘ती’ नोटीस जिल्हा न्यायालयाने केली रद्द
पुणे : न्यायालयाचं कामकाज सुरु असताना महिला वकिलांनी केस व्यवस्थित करु नयेत.अशी नोटीस पुणे जिल्हा न्यायालयाने बजावली होती.
नोटीशीवरुन मोठा वाद झाल्यानंतर अखेर ही नोटीस रद्द करण्यात आली आहे. वरिष्ठ महिला वकीलांनी हा विषय उचलून धरल्यानंतर अखेर ही नोटीस रद्द करण्यात आली.
पुणे जिल्हा न्यायालयाने 20 ऑक्टोबरला बजावलेल्या नोटीशीत महिला वकिलांना कोर्टात सुनावणीदरम्यान केस सावरु नये किंवा नीट करु नये असं सांगितलं होतं. महिलांनी असं केल्यास न्यायालयाच्या कामाकाजात लक्ष विचलित होतं आणि न्यायालयाच्या सुनावणीत अडथळा येतो, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे नोटीसवर पुणे जिल्हा न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांची स्वाक्षरीही आहे. वरिष्ठ महिला वकिलांनी हा मुद्दा समोर आणल्यानंतर शेवटी ही नोटीस मागे घेण्यात आली.
वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी नोटीस ट्वीटरवर शेअर केल्याने सोशल मिडीयावर चांगलीच खळबळ माजली होती. “आता बघा! महिला वकिलांकडून कोण आणि का विचलित होत आहे. असं कॅप्शन देत जयसिंह यांनी न्यायालयाने काढलेल्या नोटीशीचा फोटो ट्विट केला होता. सोशल मिडीयावर यावरुन टीकाही होऊ लागल्या.
