दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना पाडव्यादिवशी दिवाळी फराळ वाटप :
पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी हे दिवाळीनिमित्त सुट्टी असतानाही वेगवेगळया कारणांमुळे आपल्या गावी/घरी जाऊ शकत नाहीत. हे सर्व विद्यार्थी विद्यापीठ परिसरातील वसतिगृहामध्ये राहत असतात. बहुतांश विद्यार्थी सणानिमित्त आपापल्या गावी गेल्यानंतर काही विद्यार्थी वसतिगृहातच वास्तव्य करतात. तर काहीजण दिवाळीचा पहिला दिवस / लक्ष्मीपूजन घरी करून परत विद्यापीठात येतात. अशा विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळ देण्याची प्रथा दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरु आहे. यावर्षीदेखील मा. प्र. कुलगुरू यांच्या विशेष उपस्थितीत दिवाळीनिमित्त बुधवार, दि. २६ ऑक्टोंबर, २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठातील मार्बल हॉल येथे फराळ वाटप करण्यात आले. यावेळी मा. प्र. कुलगुरू , संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, व विद्यापीठातील काही अधिकारी उपस्थित होते. यावेळी ४५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे मा. प्र. कुलगुरू व संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, यांच्याशी मनमोकळा अनौपचारिक संवाद केला, आणि अशा उपक्रमांमुळे विद्यापीठ आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एकप्रकारचा कौटुंबिक जिव्हाळा दृढ होतो अशी भावना व्यक्त केली.
