Thursday, May 28, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

ऋषी सुनक होणार इंग्लंडचे नवीन पंतप्रधान

लंडन -: मुळ भारतीय वंशाचे ऋषी सुनक  इंग्लंडचे  नवीन पंतप्रधान होणार आहेत. ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डोंटचा पराभव करून विजय मिळवला आहे. ऋषी सुनक यांच्या समर्थनार्थ 185 हून अधिक खासदार आहेत. तर पेनी मॉर्डंट यांना केवळ 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला. औपचारिक घोषणेनंतर, ऋषी सुनक हे 28 ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात आणि 29 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे नाव देखील होते. मात्र त्यांनी आपले नाव मागे घेतल्याने सोमवारी ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व हाती घेण्याची शक्यता अधिक वाढली. बोरिस जॉन्सन यांनी रविवारी रात्री पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती.

तत्पूर्वी आपली उमेदवारी जाहीर करताना ऋषी सुनक म्हणाले होते की, त्यांना देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करायची आहे, पक्षाला एकत्र करायचे आहे आणि देशासाठी काम करायचे आहे. यापूर्वी सोमवारी, माजी गृहमंत्री प्रिती पटेल, कॅबिनेट मंत्री जेम्स क्लेवर्ली आणि नदीम जाहवी यांच्यासह अनेक प्रमुख कंझर्व्हेटिव्ह खासदारांनी सुनकच्या समर्थनार्थ जॉन्सन यांच्या गटातून बाहेर पडले. प्रिती पटेल या भारतीय वंशाच्या माजी ब्रिटीश मंत्री आहेत. ज्यांनी मागील महिन्यात लिझ ट्रस पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कंझर्व्हेटिव्ह पक्षाने सुनक यांना नेतृत्वाची संधी द्यावी, असं त्या म्हणाल्या होत्या.

ऋषी सुनक यांचे आई-वडील मूळचे भारतीय आहेत. त्यांचा जन्म 12 मे 1980 रोजी साउथम्प्टन, इंग्लंड येथे झाला. त्यांच्या भारतीय कनेक्शनबद्दल सांगायचे झाले तर,  ऋषी सुनक यांचे आजी-आजोबा भारतातून आफ्रिकेत स्थायिक झाले होते. त्यानंतर त्याचे वडील आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. ऋषी सुनक यांचे आजोबा पंजाबमधून टांझानियाला गेले. यानंतर त्याच्या आईचे कुटुंब टांझानियाहून ब्रिटनमध्ये गेले. त्याच्या आई-वडिलांनी ब्रिटनमध्येच लग्न केले. ऋषी सुनक हे 42 वर्षांचे असून त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीसोबत लग्न केले आहे. ऋषी सुनक हे पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ब्रिटनचे ते सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत आणि त्यांची संपत्ती 7300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading