सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल गायनाने रसिकांना आली भक्ती-प्रेमरसाची अनुभूती
पुणे : सुप्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर आणि सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल गायनाने रसिकांना आज भक्ती आणि प्रेमरसाची अनुभूती तर आलीच त्याच बरोबरीने या गायक द्वयींच्या सुरात सूर मिसळून गाण्याचा आनंदही लुटला. निमित्त होते ते रौप्य महोत्सवात पदार्पण करणाऱ्या महावीर एंटरप्रायजेस आयोजित स्वर सुरांची आनंदयात्रा या कार्यक्रमाचे.
सार्वजनिक जीवनात वावरत असताना समाजाचे आपणही देणे लागतो या भावनेतून महावीर एंटरप्रायजेस समाजातील विविध घटकांसाठी अनेक उपक्रम राबवित आहे. सामाजिक जाणीवांचा भाग म्हणून आज बालगंधर्व रंगमंदिरात स्वर सुरांची आनंदयात्रा या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक धन्यकुमार दर्डा यांनी केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक प्रकाश धारिवाल, नितीन ज्ञाती, अनिरुद्ध देशपांडे, उमेश मगर, जगदिश कदम, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, नंदू घाटे, अंकुश अजबे, उषा रंगराजन, हरिभाऊ आगाशे, आर्किटेक्ट करण दर्डा, मनोज दर्डा, सौरभ चोपडा, अतुल चोरडिया या मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून केले.
कार्यक्रमाची सुरुवात सुरेश वाडकर यांनी ॐकार स्वरूपा या भक्तीगीताने केली. सकाळच्या प्रसन्न वातावरणात ॐकाराच्या निनादाने रसिकांमध्ये चैतन्याची लहर पसरली. ‘देवाचिये द्वारी’, ‘काळ देहासी आला’, ‘श्रीमद् नारायण नारायण’ या गीतात रसिक रममाण झाले. रसिकांशी संवाद साधत अनुराधा पौडवाल यांनी ‘ओम जय जगदीश हरे’ ही आरती सादर करतानाच उपस्थितांना टाळ्यांच्या ठेक्यावर ताल धरायला लावला. ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ हा तारकमंत्र, ‘स्वामी समर्थ माझे आई’, ‘आरती साईबाबा’, ‘अच्युतम् केशवम् कृष्ण दामोदरम्’ या रचना सादर करून रसिकांना भक्तिरसाची अनुभूती दिली.
विनायक नेटके (तबला), कृष्णा मुसळे (पखवाज), प्रभाकर मोसमकर (ढोलक), केदार मोरे (ढोलकी), दत्ता तावडे (ऑक्टोपॅड), दिप्ती कुलकर्णी (हार्मोनियम), संजय महाडिक (गिटार), सत्यजित प्रभू (की-बोर्ड), अमर ओक (बासरी), मिहिर भडकमकर (की-बोर्ड), करण वावरे (की-बोर्ड) यांनी साथसंगत केली. गायक-संगीतकार चंद्रशेखर महामुनी, सचिन इंगळे यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन स्नेहल दामले, योगेश सुपेकर यांनी केले.
