Pune – १२ तासांपेक्षा कमी कालावधीत तब्बल १०४ मिलीमीटर पावसाची नोंद
पुणे:काल राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार घातला होता.अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्तीचा पाऊस पडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. तर अवकाळी पावसामुळे शेतीचे देखील माठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर पावसाचा फटका शहरांना देखील बसला आहे.
पुणे शहरात काल रात्री ९ नंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसाने पुणे तारांबळ उडवली होती. विजांच्या कडकडाटात पडणाऱ्या संततधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यामुळे अवघ्या १२ तासांपेक्षा कमी कालावधीत शहरात तब्बल १०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
२०२० नंतर २४ तासांच्या कालावधीत १०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ असली, तरी रात्रभरात अर्थात १२ तासांत कदाचित ही दुर्मिळ घटना असावी. शिवाजीनगर येथील भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यापी यांनी सांगितलं की, माझ्या पाहण्यातील तरी एवढ्या कालावधीतील ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे.
दिवसभर आकाश अंशतः ढगाळ आणि दुपारनंतर पावसाची शक्यता पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी रेनकोट किंवा छत्री तर सोबत बाळगावी, त्याच बरोबर पावसाचा अंदाज घेऊन दिवसभराच्या कार्यक्रमांची आखणी करावी असं आवाहान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
