fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

प्राचीन अखंड भारताच्या मानचित्राचे राज्यपाल्यांच्या हस्ते पूजन

पुणे : आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना प्राचीन भारताची ओळख व्हावी व आपला दैदीप्यमान इतिहास भूगोलातील नकाशाच्या माध्यमातून मुलांच्या नजरेसमोर रहावा, या हेतूने थ्री डी स्वरुपात साकारण्यात आलेल्या प्राचीन अखंड भारताच्या मानचित्राचे पूजन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले. सदाशिव पेठेतील शिक्षण प्रसारक मंडळीच्या एस.पी.एम.इंग्लिश स्कूलमध्ये हा अखंड भारताचा १५ बाय १० फूट आकाराचा नकाशा साकारण्यात आला आहे.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. एस.के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाळा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई, राजेंद्र पटवर्धन, सुधीर काळकर, नियामक मंडळ सदस्य पराग ठाकूर, अशोक वझे, संस्थेच्या सचिव डॉ.राधिका इनामदार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांसह इतर शिक्षिका आदी उपस्थित होत्या.

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, अखंड भारत आपण प्रत्यक्षात पाहिला नाही, पण नकाशामध्ये मात्र आपण तो आज पाहू शकतो ते केवळ या संस्थेने घेतलेल्या पुढाकारामुळे. आजपर्यंत कोणत्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अशाप्रकारे अखंड भारताचा नकाशा मी पाहिला नाही, असे त्यांनी नमूद केले. नकाशाद्वारे भारताचा गौरवपूर्ण इतिहास भूगोलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत जाईल, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई यांच्या संकल्पनेला मूर्त रुप देण्यासाठी शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी तसेच बकेट डीझाईन या डिझाईन स्टुडिओ चे मुख्य डिझाईनर हृषिकेश राऊत व त्यांच्या टीमने ४ महिने संशोधन करुन सर्व माहिती गोळा केली. ही माहिती नकाशा स्वरूपात मांडायला आणि नकाशाचे निर्मिती करायला ३ महिने लागले. एस.पी.एम. च्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांची या कामात महत्वाची मदत झाली. थ्री डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केल्यामुळे भारताचा सगळा भूभाग पाहताक्षणी डोळ्यासमोर उभा राहतो. या नकाशात भारताचे प्राचीन रूप पाहायला मिळते.

सोळा महाजनपदे, सप्तसिंधू, चारधाम, बारा ज्योतिर्लिंग, चार आदि शक्तीपीठे, सप्त मोक्षपुरी, प्राचीन विश्व विद्यालये, पर्वत रांगा, इतिहासातील साम्राज्ये आणि त्यांचे प्रदेश, प्रदेशांची इतिहासातील पूवीर्ची नावे, शहारांची इतिहासातील पूवीर्ची नावे, शहरांची आत्ताची नावे, राज्यांच्या सीमा रेषा, देशांच्या सीमा रेषा, राज्यांच्या आणि देशांच्या राजधानीची शहरे, कुंभस्थान आदी ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. मानचित्राबद्दलची माहिती वैष्णवी गुळवे हिने दिली. हर्षिता जोशी हिने सूत्रसंचालन केले. रमा कुलकर्णी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading