Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

गायन, वादन अन्‌‍ नृत्याविष्काराला रसिकांची भरभरून दाद

पुणे : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सवात सुरेल गायन, सुमधूर बासरीवादन आणि बहारदार नृत्याचा आविष्कार पुणेकर रसिकांना आज अनुभवायला मिळाला.
निमित्त होते ते केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या (आयसीसीआर) होरायझन उपक्रमाअंतर्गत आयोजित कोजागिरी पौर्णिमा महोत्सवाचे. भारतीय विद्या भवन यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास, ज्येष्ठ कथक गुरू डॉ. मनिषा साठे, तसेच भारतीय विद्या भवनचे मानद सचिव  प्रा. नंदकुमार कार्किडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आयसीसीआरच्या विभागीय निदेशक निशी बाला आणि आयसीसीआरचे मानद सल्लागार पंडित सुहास व्यास यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आयसीसीआरच्या कार्यक्रम अधिकारी संजीवनी स्वामी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.


या सांस्कृतिक मैफलीची सुरुवात नृत्यगुरू डॉ. सुचेता चापेकर यांच्या शिष्या अरुंधती पटर्वधन (भरतनाट्यम), नृत्यगुरू योगिनी गांधी यांच्या शिष्या रसिका गुमास्ते (ओडिसी) आणि नृत्यगुरू शांभवी दांडकेर यांच्या शिष्या अस्मिता ठाकूर (कथक) यांच्या एकत्रित ‘त्रितत्वम्‌‍’ नृत्य प्रस्तुतीने झाली. भरतनाट्यम, ओडिसी आणि कथक या भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींचा अनोखा संगम साधत गणेशवंदनेतून श्रीगणेशाची शैव उपासना दर्शविली गेली तर श्रीकृष्णाची वैष्णव उपासना दाखविताना राधा, यशोदा आणि मीरा यांच्या भूमिकांमधून रती-वात्सल्य-भक्ती यांचे भावप्रकटीकरण करण्यात आले. श्री देवीची शाक्त (शक्ती) उपासना दर्शविताना स्त्री शक्तीच्या उर्जेतून शक्तीतत्त्व प्रकट झाले. भरतनाट्यम, ओडिसी आणि कथक या तीनही नृत्यशैलीतील सारखेपणा दाखवितानाच त्या त्या नृत्यशैलीचे वेगळेपणही जपले गेले.
कार्यक्रमाच्या पुढील भागात पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य सुनील अवचट यांचे बासरीवादन झाले. अवचट यांनी स्त्रीशक्तीची महती सांगत, त्याला नमन करत राग सरस्वतीने मैफलीची सुरुवात केली.  त्यांना समीर पुणतांबेकर यांनी समर्पक तबलासाथ केली.


कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात आरती ठाकूर-कुंडलकर यांचे गायन झाले. त्यांनी गायनाची सुरुवात राग मारुबिहागने केली. यात विलंबित एकतालात डॉ. प्रभा अत्रे यांची लोकप्रिय बंदिश ‘कल नाही आए’ सादर करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.  त्यांना लीलाधर चक्रदेव (हार्मोनियम), रोहित मुजुमदार (तबला) आणि कस्तुरी कुलकर्णी (तानपुरा) यांनी साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिता लेले यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading