एका तरुण व्यावसायिकाचे भरदिवसा अपहरण केल्याप्रकरणी गँगस्टर गजा मारणे वर गुन्हा दाखल
पुणे: गँगस्टर गजा मारणे आणि त्याच्या गॅंगवर एका तरुण व्यावसायिकाचे भरदिवसा अपहरण करून २० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यवसायिकाची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे, मात्र या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
शेअर मार्केटच्या व्यवहारातील पैशावरुन हे अपहरण झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी एका महिलेसह गजा मारणे, पप्पू घोलप, हेमंत पाटील, फिरोज तात्या, अमर किरदत्त, रुपेश मारणे आणि त्यांचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत एका ३३ वर्षीय व्यवसायिकाने तक्रार दिली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेले व्यावसायिक यांचा रिअल इस्टेट व शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय असून संशयित आरोपी हेमंत पाटील यांनी त्यांच्याकडे शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवले होते. फिर्यादी यांच्याकडून त्यातील काही रक्कम न मिळाल्याच्या कारणावरून गजा मारणे या टोळीतील आरोपींनी फिर्यादीवर पाळत ठेवून त्यांचे सात ऑक्टोबरला सायंकाळी कात्रज येथून अपहरण केले.
यावेळी सूर्य आधी व त्यांचा मित्र श्रीकांत जाधव अशा दोघांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून यांचे अपहरण करण्यात आले, मुंबई बेंगलोर हायवे रोडने रात्रभर वेगवेगळ्या गाडीमधून फिरवून फिर्यादीवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण केली. तसेच त्यांची गाडी काढून घेत त्यांना वीस कोटीची खंडणी मागितली, खंडणी न दिल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतीत खंडणी विरोधी पथक दोनला याची माहिती मिळाल्यानंतर शिताफीने चौघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले गजा मारणे टोळीतील सदस्य असून या घटनेनंतर गजा मारणे टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
