Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

रा.स्व.संघ कसबा भाग मोतीबाग नगरचे पथसंचलन उत्साहात


मोतीबागेत ध्वजवंदन आणि एस.एस.पी.एम.एस. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला मानवंदना ; रेणुका स्वरुप प्रशालेतून विजयादशमी पथसंचलनाला प्रारंभ

पुणे : घोषपथकाचा तालबद्ध ठेका आणि शिस्तबद्ध संचलन करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भाग मोतीबाग नगराचे विजयादशमी पथसंचलन उत्साहात पार पडले. तब्बल ५०० हून अधिक स्वयंसेवकांनी संपूर्ण गणवेशात सदंड सहभाग घेतला. मोतिबागेतील ध्वजवंदन आणि शिवाजीनगर एस.एस.पी.एम.एस. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत घोषपथकाची मानवंदना देखील देण्यात आली.

एस.एस.पी.एम.एस. येथील मानवंदना कार्यक्रमाला रा.स्व.संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कसबा भाग संघचालक अ‍ॅड.प्रशांत यादव आदी उपस्थित होते. त्यानंतर सदाशिव पेठेतील रेणुका स्वरुप प्रशालेच्या मैदानावरुन प्रत्यक्ष पथसंचलनाला प्रारंभ झाला. ठिकठिकाणी ज्येष्ठांसह लहान मुलांनी देखील पुष्पवृष्टी करीत पथसंचलनाचे स्वागत केले.

रेणुका स्वरुप प्रशालेतून निघालेले पथसंचलन शहराच्या मध्यभागात खजिना विहीर चौक, चिंचेची तालीम चौक, बदामी हौद चौक, जिलब्या मारुती चौक, शनिपार, नागनाथ पार चौक, पत्र्या मारुती चौक, मोदी गणपती मंदिर मार्गे पेरुगेट पोलीस चौकावरुन रेणुका स्वरुप प्रशालेत आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासून हिंदू समाजाचे संघटन करण्यासोबतच समाजामध्ये विजयाकांक्षा जागविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या दृष्टीकोनातूनच विजयादशमी उत्सव केला जातो.

सरसंघचालक प.पू.डॉ.हेडगेवार यांनी सन १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करुन दुर्बल आणि असंघटित झालेल्या हिंदू समाजाला संघटनासूत्रात गुंफण्याचे कार्य सुरु केले. आज संघाचे विशाल वटवृक्षात रुपांत झाल्याचे दिसून येते. शिस्तबद्ध संघटनेच्या शक्तीचे समाजाला दर्शन घडावे, याकरीता दरवर्षी पथसंचलन केले जाते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading