fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsPUNE

प्रतिभेला प्रतिमेत प्रतिबिंबीत करणे म्हणजे कला : डॉ. सुचेता परांजपे

पुणे : ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कला व संस्कृती विशेष उद्दिष्ट गटातर्फे आयोजित ‘नृत्य समिधा’ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ.सुचेता परांजपे,डॉ.स्वाती दैठणकर,सुवर्णा गोखले यांच्या उपस्थितीत ‘शेडस् ऑफ वूमनहूड’ या माहितीपट-मालिकेचे यू ट्यूबवर प्रकाशन झाले.या मालिकेच्या पहिल्या टप्प्यामध्ये ‘भरतनाट्यम’ नृत्य माध्यमातून स्त्रीचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला गेला. ‘वेदांमधील स्त्रिया,कला व आनंद’ या विषयावर डॉ.सुचेता परांजपे यांनी संवाद साधला. माहितीपट मालिकेचा रसास्वाद डॉ.स्वाती दैठणकर यांनी सादर केला. ज्ञानप्रबोधिनी स्त्री शक्ती विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांनी ग्रामीण भागातील स्त्री सशक्तीकरणाबद्दल विचार मांडले. ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला गटातर्फे डॉ.वैदेही केळकर,मिलिंद संत यांनी स्वागत केले.माहितीपटाचे दिग्दर्शक देवेंद्र भोमे आणि माहितीपटाची संकल्पना आणि लेखन करणाऱ्या धनश्री पुणतांबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, रामभाऊ डिंबळे, सुभाष देशपांडे, डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ अनघा लवळेकर, डॉ समीर दुबळे, माजी विद्यार्थी व ज्ञानप्रबोधिनी परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘शेडस् ऑफ वूमनहूड’ या भरतनाट्यावर आधारित माहितीपटाविषयी बोलताना डॉ. स्वाती दैठणकर म्हणाल्या, ‘ हा माहितीपट अतिशय उत्तम झाला आहे. नृत्य म्हणजे स्वतःचा स्वतःशी मुक्तसंवाद असतो. नृत्य म्हणजे आसिधारा व्रत आहे. माहितीपटात देवदासींपासून चालत आलेला भरतनाट्यम चा इतिहास खूप छान मांडला आहे. मनोरंजनाबरोबरच प्रबोधनही होत आहे हे वाखाणण्याजोगे आहे. हा सगळा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत जतन करून ठेवला पाहिजे. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून हा कार्यक्रम होत आहे ही खूप चांगली बाब आहे.
ज्ञानप्रबोधिनी स्त्री शक्ती विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले या ग्रामीण भागातील स्त्री सशक्तीकरणाबद्दल विचार मांडताना म्हणाल्या, ‘नवरात्राच्या पार्श्वभूमीवर माजी विद्यार्थांच्या पुढाकारातून झालेला हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. कला ही उपजत असते. ग्रामीण भागातील स्त्री यांच्या गटात राहून सहज शिकली जाते. स्वतःच्या आतला झरा शोधायला ग्रामीण भागातील व्यक्ती असो किंवा शिक्षण न घेणारी व्यक्ती असो ती सहज व्यक्त होते. त्यामुळे कला तिच्या अभिव्यक्तीचा अविभाज्य भाग असतो.

ऋचा बोंद्रे यांच्या ‘गणेश वर्णन’ गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला गट व नृत्य विभागाविषयी मिलिंद संत यांनी प्रास्ताविक केले. वैष्णवी पुणतांबेकर आणि ईशा म्हसकर यांनी आदी तालात ‘अर्धनारीनटेश्वर ‘या नृत्याचे सादरीकरण केले. नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. डॉ. वैदही केळकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य होता. हा कार्यक्रम १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गोखले इन्स्टिट्यूटच्या काळे सभागृह येथे झाला.

Leave a Reply

%d