घागर फुंकणे कार्यक्रमातून ‘श्री सप्तश्रृंगी महालक्ष्मी’ चे नमन
पुणे : श्री सप्तश्रृंगी महालक्ष्मी देवीची महापूजा, देवीचा मुखवटा उभारणे आणि घागरी फुंकणे यांसारख्या कार्यक्रमांतून महिलांनी देवीला नमन केले. रात्री १२ वाजता देवीची दृष्ट देखील काढण्यात आली. घागर फुंकणे हा नवरात्रीतील पारंपरिक कार्यक्रम… मात्र, आजमितीस हा फारसा बघायला मिळत नाही. त्यामुळे श्री सप्तश्रृंगी महालक्ष्मी मंदिरात झालेल्या घागरी फुंकणे कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेत देवीची चरणी प्रार्थना केली.
बिबवेवाडीतील हजारे परिवाराच्या श्री सप्तश्रृंगी महालक्ष्मी मंदिरात आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवात महालक्ष्मीपूजन, घागरी फुंकणे अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात अनुराधा हजारे, संध्या तारांबळे, उषा चावरे, मिनल हजारे, कै.सितामाई शिवरामपंत करंदीकर भक्त मंडळ यांचे सहकार्य लाभले. घागरी फुंकणे यासोबतच फुगड्या, गरबा, दांडिया असे कार्यक्रम देखील महिलांनी केले. तर, कीर्ती कस्तुरे व सहका-यांचा सुगम संगीत कार्यक्रम व जंगली महाराज ग्रुपचा आत्मामालिक हा भक्ती संगीताचा कार्यक्रम देखील उत्साहात पार पडला.
यज्ञदत्त हजारे म्हणाले, मंदिराची स्थापना सन १९८१ साली झाली असून शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन कोजागिरी पौर्णिमेपर्यंत केले जाते. महोत्सवा दरम्यान महिला मंडळे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. वादन-गायन, कीर्तन, भजन, कविता, भक्तीगीते याचबरोबर सौंदर्य लहरी पठण, श्रीसुक्त, सप्तशती पाठ, कुंकुमार्चन, घागरी फुंकणे, मुखवटा उभारणे, देवीची दृष्ट काढणे असे विविध पारंपरिक सोहळे देखील केले जातात. त्याचबरोबर मंदिरात विश्व कल्याणासाठी १ कोटी श्रीसुक्त आवर्तन म्हणण्याचा संकल्प केला असून आजपर्यंत ६४ लाख आवर्तने पूर्ण झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले.