fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsPUNE

गांधी आणि आंबेडकरांचे विचार रुजवणे हे लोकशाही आणि समतेच्या समर्थकांसमोरचे खरे आव्हान – प्रा. निशिकांत कोलगे

पुणे : म. गांधीजींबद्दल समाजात खूप कमी गोष्टी माहित असून त्यातील जातीनिर्मुलनासाठी त्यांनी केलेले काम आपल्यापर्यंत जितके पोहोचायला पाहिजे तितके पोहोचलेले नाही. ते म्हणायचे की श्रमाची कामं सर्वांनी करणं यातून जातीव्यवस्था तुटेल, जसं संडास धुणे, शिवाय तथाकथित उच्चवर्णीयांनी जातीचा अहंकार सोडणे आवश्यक आहे. अशा अनेक जातीनिर्मुलनाबाबतच्या त्यांच्या कार्याच्या गोष्टी प्रा. निशिकांत कोलगे यांनी उलगडून सांगितल्या.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुणे  काँग्रेस  व लोकायत आयोजित अपरिचित गांधी व्याख्यानात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, गांधीजी लहानपणापासूनच अस्पृश्यतेला विरोध करत असत. दक्षिण आफ्रिकेत असताना, साबरमती आणि वर्ध्याच्या आश्रमात ते सर्व जातीधर्माच्या लोकांबरोबर उठबस करत असत. आश्रमातील सर्व स्त्री पुरुषांनी अगदी लहान मुलांनीही सर्व प्रकारच्या श्रमाची कामे अगदी संडास धुण्यापासून सर्व कामे केली पाहिजेत हा त्यांचा आग्रह असे आणि आश्रमवासी सर्व कामे करत असत. त्याचवेळी तथाकथित उच्चवर्णीय-जातीयांनी आपला जातीचा अहंकार सोडून दिला पाहिजे. आणि हे कायद्याने नाही तर ते मूल्य म्हणून जनमानसात रुजले पाहिजे, असा त्यांचा विचार होता.

दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले तेव्हा म्हणजे १९१५ला केवळ अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार मांडणाऱ्या गांधीजींनी १९४० सालापर्यंत जातीनिर्मूलानासाठी आंतरजातीय विवाहांना नुसता पाठींबा दिला नाही तर आंतरजातीय विवाह घडवून आणले. ते स्वतःला सनातनी म्हणत असले तरी त्यांच्या व्यवहारात मात्र सनातनी विचार नव्हते. जसे मूर्तिपूजा ते करत नव्हते ना ही कोणत्या मंदिरात जात होते मात्र कोणी करत असेल तर त्याचा ते आदर करत होते. सर्वांना कोणत्याही बंधनाशिवाय वावरण्याचा अधिकार आहे आणि म्हणून दलिताना मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे हा त्यांचा विचार होता. आजच्या काळात गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतीके म्हणून वापर केला जातो. खरंतर त्यांचे विचार समाजात रुजवणे हे लोकशाही आणि समतेच्या समर्थकांसमोरील मोठे आव्हान आहे आणि ते त्यांनी पेलण्याची गरज प्रा. कोलगे यांनी अधोरेखित केली.गांधीजींना अधिक जाणून घ्यायचे असेल, त्यांच्याबद्दल साहित्य वाचायचे असेल तर मनीभवन वेबसाईटवर पुस्तकांची बरीच मोठी यादी असल्याचेही कोलगे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकायतच्या अलका जोशी यांनी तर महाराष्ट्र कॉंग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड यांनी प्रास्ताविक केले.  

Leave a Reply

%d bloggers like this: