fbpx

रा.स्व.संघ कसबा भागाचा विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव साजरा

पुणे :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासून हिंदू समाजाचे संघटन करण्यासोबतच समाजामध्ये विजयाकांक्षा जागविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या दृष्टीकोनातून व शिस्तबद्ध संघटनेच्या शक्तीचे समाजाला दर्शन घडावे याकरिता विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भाग तरुण विभागातर्फे शनिवार पेठेतील विष्णू कृपा हॉल येथे शस्त्रपूजन उत्सव पार पडला.

यावेळी अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख सुनील मेहता हे प्रमुख वक्ते तर, ब्रिंटॉन फार्मास्युटिकल्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राहुलकुमार दर्डा हे प्रमुख पाहुणे तसेच रा.स्व. संघ पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कसबा भाग संघचालक अ‍ॅड.प्रशांत यादव उपस्थित होते.

सुनील मेहता म्हणाले, हिंदू संस्कृतीमध्ये शक्तीची आराधना ही प्राचीन काळापासून केली जाते. स्वत:ला समर्थ व सिद्ध करण्यासाठी शक्ती आराधनेची परंपरा आहे. हिंदू समाजात शक्तीचा उपयोग लोकांना कष्ट देण्यास, शोषण करण्यास केला जात नाही. मात्र, अत्याचारापासून बचाव करण्यास केला जातो. भारतात भाषा, उत्सव, प्रांत व उपासना पद्धती वेगवेगळ्या आहेत. तरी देखील भारत हा विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा देश आहे. येथे रा.स्व. संघ समाज संघटनाचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुलकुमार दर्डा म्हणाले, ज्या वयात योग्य संस्कार होणे गरजेचे असते, ते संस्कार रा.स्व. संघाच्या शाखेत योग्य वयात मिळतात. सर्व समान आहेत, ही शिकवण शाखेने दिली. तर, खेळातून धाडसीपणा देखील शिकण्यास मिळाला, असे सांगत शाखेचे महत्व त्यांनी सांगितले.

अ‍ॅड.प्रशांत यादव म्हणाले, शस्त्र व शास्त्र ही दोन्ही आपल्या संस्कृतीची केंद्र असून दोन्हींची पूजा केली जाते. इतिहासात नमूद केल्याप्रमाणे आपल्या संस्कृतीत शस्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे. देवदेवतांची हाती शस्त्रे असून त्या प्रतिमा ही आपली बलस्थाने आहेत. तसेच ती आपल्या पराक्रमाची देखील चिन्हे आहेत. आपला इतिहास हा शौर्याचा असून तो सर्वांपर्यंत पोहोचविण्याकरिता शस्त्रपूजनाचा उत्सव केला जातो.

सरसंघचालक प.पू.डॉ.हेडगेवार यांनी सन १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करुन दुर्बल आणि असंघटित झालेल्या हिंदू समाजाला संघटनासूत्रात गुंफण्याचे कार्य सुरु केले. आज संघाचे विशाल वटवृक्षात रुपांत झाल्याचे दिसून येते. त्यातील एक भाग असलेल्या शस्त्रपूजन उत्सव साजरा केला गेला. यंदाच्या उत्सवात स्वयंसेवक सदंड, संपूर्ण गणवेशात सहभागी झाले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: