fbpx

कुटुंबाप्रमाणे देशाचे नेतृत्व करण्यात महिलांचा मोलाचा वाटा – भूषण गोखले यांचे मत

पुणे : आज समाजात महिलांवर होणारे अत्याचार वाढत आहेत. फक्त या नऊ दिवसात त्यांचा सन्मान नाही तर कायम महिलांचा सन्मान केला पाहिजे. कुटूंब एकत्रित ठेवण्याचे काम महिला करतात तसेच आता मुली आर्मीमध्ये जात आहेत. राजकारणात देखील महिला सक्रीय असून देशाचे नेतृत्व देखील करत आहेत, असे मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले.
श्री भवानी प्रतिष्ठान व परिवर्तन ट्रस्टच्यावतीने स्त्री शक्ती सन्मान जागर या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार संघात करण्यात आले होते. यावेळी डॉ. विजय भटकर, पंडित वसंत गाडगीळ, श्री भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव, परिवर्तन ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश गुजर, संजय चोरडिया, अखिल झांजले, विक्रम मूर्ती, संतोष फुटक, सुभाष सुर्वे आदी उपस्थित होते.
ललिता विजय भटकर, मेघना भूषण गोखले, डॉ. गीतांजली अभिजीत वैद्य, सुषमा संजय चोरडिया, सुप्रिया दिलीप हांडे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्योती अंकुश काकडे यांचा पुरस्कार देवश्री मयुरेश काकडे यांनी स्विकारला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी शैलेश गुजर यांनी उपस्थित पुरस्कारार्थी महिलांची रंजक मुलाखत घेतली.
डॉ. विजय भटकर म्हणाले, भारतीय संस्कृतीत मातृशक्तीला महत्व दिले आहे. आजच्या काळात ते महत्व ओळखून त्याची उजळणी झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
मेघना गोखले म्हणाल्या, कुटुंब आनंदी असेल तर बाहेर काम करणाऱ्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने काम करता येते. या विचाराने घरच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि आजही सांभाळत आहे. तसेच आर्मीच्या कुटुंबातील लोक आमच्याकडे वडिलकीच्या नात्याने बघतात. त्यामुळे त्यांना सांभाळून घेवून त्यांचे प्रश्न सोडविणे ही देखील मला माझी जबाबदारी वाटते, असेही त्यांनी सांगितले.
सुप्रिया हांडे म्हणाल्या, आमचे पती हे सातत्याने प्रकाश झोतात असतात त्या प्रकाशाची ऊर्जा आम्ही कुटुंबाला देत असतो. आमचे पती यशस्वी होतात त्याच्या मागे आमची त्याग भावना आणि आमच्या सदिच्छा असतात त्यामुळे कुटुंबाला चांगले संस्कार मिळतात आणि आमची मुलं समाजामध्ये ताठ मानेने जगतात.

Leave a Reply

%d bloggers like this: