fbpx

पोलीस दलातील महिला शक्तीचा श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे गौरव

पुणे : नारी शक्तीचा सन्मान करताना स्थानिक पातळीवर संरक्षण क्षेत्रात पोलीस दलाच्या माध्यमातून काम करणा-या महिला पोलीस शक्तीचा गौरव सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात करण्यात आला. पुणे शहराच्या पोलीस उपायुक्तांपासून ते पोलीस चौकीमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकापर्यंत प्रत्येक महिलेच्या कार्याला यानिमित्ताने मानवंदना देण्यात आली.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात महिला पोलिसांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले, रमेश पाटोदिया, नरेश जालन, विशाल सोनी आदी उपस्थित होते.

पुण्याच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, रुक्मिणी गलांडे, निलीमा पवार, पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, पोलीस उपनिरीक्षक किर्ती चाटे आदींचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह व महावस्त्र देऊन महिला पोलिसांचा गौरव करण्यात आला.

श्याम जाजू म्हणाले, पोलीस दलातील महिला मोठया प्रमाणात जनतेसाठी कष्ट करीत असतात. स्वत:चे घर व कुटुंब सांभाळत पोलीस दलाच्या माध्यमातून समाजाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते. तरी देखील हे कार्य ते लिलया पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव व्हायला हवा.

नम्रता पाटील म्हणाल्या, नवरात्रीमध्येच केवळ नारीशक्तीची पूजा न होता ती ३६५ दिवस व्हायला हवी. यामाध्यमातून महिलांना देखील वेगळे बळ मिळेल. तसा आम्ही देखील पोलीस दलाच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न करीत असतो.

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, जसे सैनिकांमुळे देश तसेच पोलिसांमुळे आज समाज सुरक्षित आहे. या कार्यात महिला वर्गाचा सहभाग देखील वाढत आहे. त्यामुळे यंदा महिला पोलिसांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: