Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRA

लम्पी लसीकरणा करिता ईंटर्न डॉक्टरांना मानधन

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर लम्पी आजाराच्या एकूण 106.62 लक्ष लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पशुधनावर लम्पी लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू असून आता पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता छात्र (ईंटर्न) यांना पाच रुपये प्रती लसमात्रा प्रमाणे मानधन देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

आयुक्त सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. 28 सप्टेंबर 2022 अखेर 31 जिल्ह्यांमधील एकूण 1976 गावांमध्ये फक्त 33 हजार 306 जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 33 हजार 306 बाधित पशुधनापैकी एकूण 13 हजार 859 पशुधन उपचाराने बरे झालेले आहेत. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 106.62 लक्ष लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून बाधित क्षेत्राच्या 5 किमी परिघातील 1976 गावातील 46.72 लक्ष पशुधन आणि परिघाबाहेरील 34.40 लक्ष पशुधन अशा एकूण 81.15 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे.

“लम्पी चर्मरोग आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही.  या रोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.  हा रोग माशा, डास, गोचिड इ. कीटकांमार्फत पसरत असल्याने या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व नगरपरिषद अधिकाऱ्यांनी कीटनाशकांची फवारणी करावी. तसेच सर्व पशुपालकांमध्ये जनजागृती करावी. लम्पी चर्मरोगावर उपयुक्त असणाऱ्या औषधींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून लम्पी चर्मरोगावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिक, सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता छात्र (ईंटर्नीज) यांना पाच रुपये प्रती लसमात्राप्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले आहे.

शासनाने खाजगी पशुवैद्यकांना लम्पी चर्मरोगाचा उपचार करण्यासाठी कोणतीही बंदी घातलेली नाही. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 24 सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या सुधारित उपचार संकेताप्रमाणे उपचार करावेत, अशा सूचना सिंह यांनी दिल्या आहेत. याबाबत तक्रार असल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. पशुपालकांनी तक्रार विभागाचा  टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ वर तक्रारी नोंदविण्याचे आवाहन सिंह यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading