fbpx

लोककलावंत प्रभा शिवणेकर यांना ‘दुर्गा पुरस्कार ‘ प्रदान

पुणे : हिंदू महिला सभेतर्फे देण्यात येणारा ‘दुर्गा पुरस्कार ‘ यंदा ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यातील गंगीची भूमिका अजरामर करणाऱ्या प्रसिद्ध लोककलावंत प्रभाताई शिवणेकर यांना वंचित विकास संस्थेच्या संचालिका व कार्यवाह मीना कुर्लेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सभेतर्फे आयोजित ७२ व्या नवरात्र महोत्सवाअंतर्गत बुधवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी सदाशिव पेठ येथील शिवाजी मंदिर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी लेखक प्रभाकर ओव्हळ, सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले, उपाध्यक्ष यशश्री आठवले आणि सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. मानपत्र, साडी- चोळी आणि मानधन असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यावेळी कुर्लेकर म्हणाल्या,” आपण एकीकडे स्त्रीला शक्तीचे रूप मानतो. तिच्या सन्मानासाठी कार्यक्रम करतो. पण त्याचवेळी काही स्त्रियांना विधवा, परितक्त्या स्त्री म्हणून हिणवले जाते. समाजाने सर्व स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे. लोकांनी कुठल्याही स्त्रीला वाईट शब्दाने न बोलता तिला मान द्यायला शिकले पाहिजे. तसेच एखाद्या स्त्रीला विधवा, परितक्त्या स्त्री असे न म्हणता तिला ‘अभया’ म्हणावे. यासाठी समजातील प्रत्येक व्यक्तीने स्वतः मध्ये बदल घडवला पाहिजे.”

कार्यक्रमात आश्विनी करंदीकर आणि सुप्रिया चित्राव यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या अजरामर गीते आणि आठवणींचा ‘फुले वेचिता’ हा कार्यक्रम सादर करत लता मंगेशकर यांना सांगीतिक आदरांजली वाहिली.

Leave a Reply

%d bloggers like this: