fbpx

ठाकरे सरकारने रोखलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जारी करण्यात यावी – जगदीश मुळीक

पुणे : वसुली आणि वाटाघाटी एवढाच कार्यक्रम राबविणाऱ्या ठाकरे सरकारने गुंडाळलेली वैधानिक विकास मंडळे पुन्हा स्थापन करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने विकासाचा मार्ग पुन्हा मोकळा केला आहे, अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी युती सरकारचे अभिनंदन केले आहे. केवळ राज्यपालांविषयीचा आकस आणि त्यांच्या अधिकारावर गदा आणण्यासाठी ठाकरे सरकारने राज्याच्या विकासालाच खीळ घातली आणि वसुलीचा एकमार्गी कार्यक्रम राबविला, अशी टीकाही त्यांनी केली.

विकास कार्यक्रमांसाठी निधी वाटपाचे अधिकार राज्यपालांच्या हाती गेले, तर वसुली आणि वाटाघाटींचे मार्ग बंद होतील या भीतीने ठाकरे सरकारने वैधानिक विकास मंडळाची मुदत वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत असा आरोप करून श्री जगदीश मुळीक म्हणाले की, ठाकरे आणि राज्यपाल यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणामुळे राज्याचा विकास दोन वर्षे रखडला असून विकासाचा अनुशेष आणखी वाढला आहे. एप्रिल २०२० मध्ये वैधानिक विकास मंडळांची मुदत संपल्यानंतर ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविणे टाळले, त्यामुळे दोन वर्षांत मराठवाडा, विदर्भ, आणि उर्वरित महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले नाहीत. राज्याच्या विकासास खीळ घालण्यास ठाकरे सरकारच जबाबदार आहे. ठाकरे सरकारने रोखलेल्या व महाराष्ट्राच्या विकासास खीळ घातलेल्या विकास प्रकल्पांची व त्यामुळे त्यांच्या सत्ताकाळात झालेल्या अधोगतीची माहिती राज्याला देण्यासाठी श्वेतपत्रिका जारी करा, अशी मागणीही जगदीश मुळीक यांनी शिंदे सरकारकडे केली.

वैधानिक विकास मडळांची पुन्हा स्थापना करण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल श्री जगदीश मुळीक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.  वैधानिक विकास मंडळांची स्थापना झाल्यानंतर १९९४ नंतर प्रथमच ठाकरे सरकारमुळे ३० एप्रिल २०२० पासून या मंडळांचा कारभार ठप्प झाला. त्याआधी राज्यातील विकासाचा अनुशेष झपाट्याने कमी होऊन उर्वरित महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा जास्त गुंतवणूक झाली होती. वैधानिक विकास मंडळे पुन्हा स्थापन करण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयामुळे ठाकरे सरकारने रोखलेला विकासाचा गाडा आता रुळावर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

%d bloggers like this: