fbpx

श्री महालक्ष्मी देवीला पारंपरिक ‘देवी जागर’ नृत्यवंदनेद्वारे नमन

पुणे : महाराष्ट्रासह भारताची संस्कृती असलेला गरबा, गोंधळ यांसह दीप व पुष्पमाला हातात घेत पारंपरिक नृत्याद्वारे श्री महालक्ष्मी देवीला नमन करण्यात आले. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपात पारंपरिक वेशात महिला नृत्यांगनांनी नृत्यवंदना सादर केली. दीप हातात घेऊन सादर केलेल्या नृत्याला उपस्थित भाविकांनी टाळ्यांची विशेष दाद दिली.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात नृत्यांगना प्रिया डिसा व सहकलाकारांनी देवी जागर नृत्यवंदना कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते.

देवीची नऊ रुपे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री या नवदुर्गांचे दर्शन व कथारुपी सादरीकरण यावेळी झाले. पारंपरिक जागरण गोंधळासह गरबा नृत्याद्वारे भारतीय संस्कृतीची ओळख कलाकारांनी उपस्थितांना करुन दिली. देवीस्तुतीच्या विविध गीतांवर नृत्य सादर करीत देवीचा महिमा देखील नृत्याद्वारे उलगडण्यात आला.

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, धार्मिक कार्यक्रमांद्वारे देवीचा जागर केला जातोच, मात्र नृत्याद्वारे देवीच्या कथा, महात्म्य भाविकांना समजावे, याकरीता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला शक्तीचा गौरव व सन्मान केवळ नवरात्री पुरता मर्यादित न राहता वर्षभर रहायला हवा. त्यामुळे मंदिरात महिला पोलीस व महिला पत्रकार सन्मान, परिचारिका गौरव सोहळा, कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 

Leave a Reply

%d bloggers like this: