Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

आयनॉक्स विंडतर्फे गुजरात, भारतात पहिली आधुनिक, नव्या तंत्रज्ञानाने युक्त पवनचक्की कार्यान्वित

नॉयडा : आयनॉक्स विंड या भारतातील आघाडीच्या पवन उर्जा सुविधा पुरवठादार कंपनीने आज भारतातील पहिली ३.३ मेगावॉट क्षमतेची पवनचक्की कार्यान्वित केली. गुजरात राज्यातील राजकोट जिल्ह्यातील जसदान तालुक्यातील रणपरदा गावात उभारण्यात आलेल्या पवनचक्कीचे उद्घाटन गुजरातचे माननीय मुख्यमंत्री  भुपेंदर पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. क्रांतीकारी ३.३ एमडब्ल्यू क्षमतेच्या, तंत्रज्ञान भागीदार आणि जागतिक पातळीवरील प्रसिद्ध एएमएससीद्वारे विकसित करण्यात आलेल्या या पवनचक्कीमध्ये १०० मीटर टर्ब्युलर टॉवर आणि १४६ मीटर रोटर ब्लेड्स – या प्रकारातील सर्वात मोठे बसवण्यात आले आहेत. या पवनचक्कीद्वारे सर्वात कमी खर्चात उर्जा पुरवठा केला जाणार असल्यामुळे भारतीय बाजारपेठेत तो वरचढ ठरू शकतो. नवी पवनचक्की भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या २०३० पर्यंत ५० टक्के उर्जा अजीवाश्म इंधनावर आधारित उर्जा स्त्रोतांपासून मिळवण्याच्या ध्येयाला लक्षणीय योगदान देण्यासाठी खास तयार करण्यात आली आहे.

माननीय मुख्यमंत्र्यांनी या कामगिरीबद्दल आयनॉक्स विंड लिमिटेडचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, सौराष्ट्राच्या नागरिकांना आणि संपूर्ण गुजरातला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. गुजरातसाठी ही कामगिरी अतिशय महत्त्वाची आहे. जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीच्या पर्यावरणात अनेक बदल झाले आहेत. येत्या काही वर्षांत आपल्याला हरित उर्जेचा वापर वाढवून तापमानवाढीच्या दुष्परिणामांची झळ कमी करावी लागणार आहे. आपले पंतप्रधान  नरेंद्र  मोदी यांनी २०७० पर्यंत देशातील कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी अशा अपारंपरिक मार्गांचा वापर करत, सौर, पवन आणि हायब्रीड उर्जेच्या वापरासह देशातील पर्यावरण सुधारेल. आज गुजरातमध्ये, कच्छ येथे भारतातील सर्वात मोठे ३० गिगा वॉट्सचे सौर आणि पवन हायब्रीड अक्षय उर्जा पार्क उभारले जात आहे. आपल्या माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या दूरदृष्टीकोनामुळे गुजरात अक्षय उर्जेच्या बाबतीत सर्वोत्तम राज्य ठरणार आहे. इतकेच नव्हे, तर  नरेंद्र  मोदी यांनी प्रगतीसह आपल्याला पर्यावरण शाश्वतीचे रहस्य मिळवून दिले आहे आणि ते हरित उर्जा क्षेत्राला विशेष प्रोत्साहन देत आहेत. आयनॉक्स विंडने या दिशेने सुरू केलेला हा उपक्रम पवन उर्जेचे आश्वासन पूर्ण करणारा असून गुजरातमधे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने घेतलेली मोठी झेप आहे. परत एकदा मी आयनॉक्स विंड लि. आणि या प्रकल्पाशी संबंधित सर्वांना शुभेच्छा देतो.

आयनॉक्सजीएफएल समूहाचे कार्यकारी संचालक देवांश जैन माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानत म्हणाले, ‘आयनॉक्सजीएफएल समूहासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. राष्ट्रउभारणीसाठी योगदान देण्याचा आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. आयनॉक्स समूह हरित तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडीवर असून कंपनीद्वारे हरित उर्जा क्षेत्रातील ईव्ही, सौर, हायड्रोजन आणि अक्षय उर्जा अशा विभागांना लक्षणीय योगदान दिले जाते.’

ही पवनचक्की आपल्या माननीय पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहेच, शिवाय त्यामुळे अक्षय उर्जेचे ध्येयही पूर्ण होणार आहे. आम्हाला विश्वास वाटतो, की ही आयनॉक्सजीएफएल समूहाच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे आणि आम्ही माननीय पंतप्रधानांच्या स्वप्नासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत राहू व भारताच्या या विकास प्रवासाचा महत्त्वाचा भाग होऊ.

आयॉनक्स विंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कैलाश ताराचंदानी म्हणाले, आयनॉक्ससाठी आतापर्यंतच्या प्रवासातला हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही क्रांतीकारी ३.३ मेगावॉट क्षमतेची पवनचक्की भारतातील कमी वारे असलेल्या प्रदेशांसाठी खास विकसित करण्यात आली आहे. आकार, क्षमता आणि स्पर्धात्मकता व आधुनिक डब्ल्यूटीजी लक्षात घेता ती भारतीय बाजारपेठेची समीकरणे बदलेल. हे नवे उत्पादन उर्जेचा खर्च कमी करण्यासाठी लक्षणीय योगदान देईल, तसेच तिचा आटोपशीर आकार लक्षात घेता उत्पादन, वाहतूक, लॉजिस्टिक्स तसेच इन्स्टॉलेशनचा खर्चही कमी असेल. हे उत्पादन जानेवारी २०२३ पासून भारतात व्यावसायिक पातळीवर उपलब्ध केले जाईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading