fbpx

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी घेतले श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन

पुणे : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मंगळवारी सकाळी १०.४५ वाजता सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी मंदिरातील श्री महासरस्वती आणि श्री महाकाली देवीचे दर्शन घेण्यासोबतच ट्रस्टतर्फे राबविण्यात येणा-या सामाजिक उपक्रमांची माहितीही जाणून घेत शुभेच्छा दिल्या.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात आरिफ मोहम्मद खान यांचे स्वागत व सन्मान श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन करण्यात आला. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले, राजू चमेडिया, निलेश लद्दड आदी उपस्थित होते.

आरिफ मोहम्मद खान म्हणाले, आपल्या सर्वांवर देवीची कृपा राहू देत. आपला देश पुढे जात राहो. आपल्या देशाला मजबूत करु. इतके आपण देशाला मजबूत करु की आपल्या हातून संपूर्ण मानवतेची सेवा होईल, अशी प्रार्थना त्यांनी श्री महालक्ष्मी देवीचरणी केली.

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, उत्सवांतर्गत श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम दररोज सुरु आहेत. याशिवाय महिला पोलीस व महिला पत्रकार सन्मान, परिचारिका गौरव सोहळा, कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे कार्यक्रम देखील होणार आहेत. ट्रस्टच्या वेबसाईट, फेसबुक पेजच्या माध्यमातून देखील जगभरातील देवी भक्त उत्सवाचा आनंद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: