Pune -भिडे पुलाजवळ ३५ वर्षीय व्यक्तीचा खून; नदी पात्रात मृतदेह आढळला
पुणे: ३५ वर्षीय व्यक्तीचा नदी पात्रात खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भिडे पुलाजवळील असलेल्या नदी पात्रात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गणेश कदम (३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून हत्या झालेल्या तरुणाच्या गळ्यावर वार केले आहेत.
आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हा मृतदेह आढळला. त्याच्याकडील तपासणीत त्याचे नाव गणेश कदम असल्याचे निष्पन्न झाले. तसेच अधिक माहीती काढली असता तो लॉन्ड्री चालक असून, त्याची शनिवार पेठेत लाँड्री असल्याचे समोर आले आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याला फोन आल्यानंतर तो घराबाहेर पडला होता. परंतु त्याचा शोध घेऊनही तो त्याच्या घरच्यांना सापडला नाही. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका सर्व्हिस सेंटर चालकाने नदीपात्रात झेडब्रीज जवळच एक मृतदेह पडला असल्याची खबर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या या निघृण खुनाच्या प्रकारामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गुन्ह्याचा पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.