fbpx

तळजाई माता की जय च्या गजरात ऐतिहासिक तळजाई मंदिरात घटस्थापना

पुणे : तळजाई माता की जय…जय माता दी… च्या जयघोषाने आणि देवीभक्तांच्या गर्दीने घटस्थापनेच्या दिवशी तळजाई मंदिराचा परिसर फुलून गेला. पुण्यातील ऐतिहासिक ४०० वर्षे जुन्या तळजाई मंदिरात नवरात्रीनिमित्त आयोजित उत्सवाची सुरुवात विजय थोरात यांच्या हस्ते घटस्थापना करुन झाली. फुलांची आकर्षक सजावट, रंगीबेरंगी दिव्यांची विद्युत रोषणाई आणि देवीचे मनोहारी रुप पाहण्याकरीता सकाळपासून भाविकांनी मोठया संख्येने गर्दी केली.
उत्सवकाळात मंदिरासमोर घालण्यात आलेल्या रंगावलीच्या पायघड्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या. नऊ दिवस रोज सकाळी ७ वाजता अभिषेक होणार आहे. तर, दुपारी १२ वाजल्यापासून दिवसभर पुणे शहरातील तसेच जिल्ह्यातील भजनी मंडळे येथे सेवा रुजू करणार आहेत. अष्टमीच्या दिवशी होम-हवन, तसेच कन्यापूजन देखील होणार आहे. पुणे शहरातील विविध भागातील महिला या ठिकाणी श्री सुक्त पठण करणार आहेत.

अण्णा थोरात म्हणाले, सन १६७२ दरम्यान महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेकाची धामधूम होती. सभारंभ रायगडावर होता आणि आराध्य देवतांचा आशीर्वाद राजांना हवा होता. तुळजापूरहून, देवीचे प्रस्थान ठेवले आणि ही पालखी पुणे मार्गे पुढे रायगडाला जाणार होती. जिजाऊ मातेच्या दर्शनासाठी काही काळ पालखी जेथे ठेवली गेली तो हाच तळजाईचा पठार. साक्षात महाराष्ट्राच्या कुलदैवतेचे अधिष्ठान आणि जिजाऊंचा पदस्पर्श या परिसरास लाभला आहे.

रावबहाद्दूर ठुबे यांचे या परिसरात वास्तव्य होते. ते देवीचे परमभक्त होते. येथील तळ्याचे पाणी दुष्काळातही आटत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. मला स्थानापन्न करण्यासाठी जे आसन तयार करशील ते सूर्यदयापूर्वीच तयार झाले पाहिजे नाही तर मी जमिनीवर ठाण मांडीन. दृष्टांताप्रमाणे ठुबे यांनी शोध घेतला आणि त्यांना तांदळाच्या स्वरूपातील पदमावती, तळजाई माता, तुळजाभवानी यांच्या मूर्ती मिळाल्या. तळ्यापासून आलेली माता म्हणून तिचे तळजाई असे नाव पडले. मातेने आसन वेळेत न झाल्याने तिने जमिनीवरच ठाण मांडले.

तळजाईच्या कृपेने वैभवाचा काळ अनुभवलेल्या रावबहाद्दूरांच्या निधनानंतर हा परिसर पुन्हा एकदा उजाड झाला होता. परंतु कै. अप्पासाहेब थोरात यांच्या सेवेतूनच या परिसराचा विकास झाला. मंदिराचा गाभारा आणि मंडप बांधला गेला. प्रवेशद्वाराशी पडवी मारुती मंदिर आणि तळजाई,पदमावती, तुळजाभवानी यांची घुमटाकार मंदिरे बांधण्यात आले. नवरात्रीच्या काळात अप्पांचा मुक्काम देवीच्या चरणापशीच असे. असेही अण्णा थोरात यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: