fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलला पाहिजे – शेखर गायकवाड यांचे प्रतिपादन‌

पुणे : मानवी संवेदना समजण्यासाठी भाषा हा फार महत्त्वाचा भाग आहे. संवादाच्या माध्यमातून एकमेकांची मने जोडली जातात. दिव्यांगांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी सांकेतिक भाषेला प्रोत्साहन देणे महत्वपूर्ण आहे. सांकेतिक भाषा समाजामध्ये प्रभावीपणे रुजणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या दिव्यांग मुलांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं आणि त्यांना समाजात स्थान मिळावं या उदात्त हेतूने डॉ. सोनम कापसे यांनी सुरु केलेले हॉटेल निश्चितच प्रेरणादायी आहे. दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलला पाहिजे. संवेदनशील माणसांनी या मुलांच्या भविष्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

फर्ग्युसन कॉलेज रोडवरील पूर्णपणे दिव्यांग मुलांकडून चालवलं जाणा-या  टेरासीन रेस्टॉरंट मध्ये जागतिक सांकेतिक भाषादिन साजरा करण्यात आला. यावेळी विशेष मुलांनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर केले व सांकेतिक भाषेतील मुलभूत प्रात्याक्षिके दाखविली. दिव्यांगांना सुरक्षित भविष्य देण्यासाठी तसेच सहानुभूतीद्वारे नव्हे तर सन्मानाचे व्यासपीठ म्हणून सुरु झालेल्या या रेस्टॉरच्या कार्यक्रमावेळी गायकवाड बोलत होते.

यावेळी बालभारतीचे संपादक किरण केंद्रे, उद्योजक कल्याण तावरे, डॉ. सोनम कापसे, वंदना गायकवाड, शैलेश केदारे उपस्थित होते.

शेखर गायकवाड म्हणाले की, भारतात सर्व जिल्ह्यात अशी मुले आहेत, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा विकास झाला पाहिजे. नवीन पिढी समाजात चांगले बदल आणत आहे, समाज देखील तो बदल स्विकारत आहे. त्यामधील एक उदाहरण म्हणजे टेरासीन हा प्रकल्प आहे. मागील अनेक वर्षे विशेष मुलांना संभाळणे आणि जगवणे हाच उद्देश ठेवून वाटचाल झाली आहे. परंतु, त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणे, इतर सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगण्यास संधी देणे हे दैवी काम आहे. असा प्रयोग विशेष मुलांना स्वतःच्या पायावर उभा करून स्वाभिमान देणारा आहे. लिखित, बोली आणि सांकेतिक भाषा असे भाषेचे तीन प्रकार असून सांकेतिक भाषा हि देवाला जोडणारी भाषा आहे. देवाशी बोलताना भावना व्यक्त करताना प्रत्येकजण वेगवेगळ्या सांकेतिक भाषेतून देवाशी संवाद साधत असतो.

डॉ. सोनम कापसे म्हणाल्या की, दिव्यांगांना स्वाभिमानाने जगासमोर उभे राहण्यासाठी सुरु झालेले हे रेस्टॉरंट नाही तर एक अनुभव आहे. या हॉटेलमध्ये स्वागतापासून ते किचन सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी मूकबधिर असणाऱ्या तरुण-तरुणींवर आहे. सामाजिक बांधीलकी जपत मूकबधिर व्यक्तींच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी हे हॉटेल सुरू केले आहे. काहीही ऐकू तसेच बोलता येत नसताना येथील कर्मचारी ग्राहकांना उत्तम सेवा देतात. या रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये खाद्यपदर्थ्यांच्या पुढे काही सांकेतिक भाषेची चित्रे दिली आहेत. ती पाहून ग्राहक कर्मचाऱ्याला ऑर्डर देऊ शकतो. त्यानंतर हे कर्मचारी ऑर्डर लिहून घेतात आणि त्याप्रमाणे ऑर्डर तयार करतात. अगदी सुटसुटीतपणे ही ऑर्डर कुणीही देऊ शकेल अशा पद्धतीने हा मेन्यूकार्ड तयार करण्यात आला आहे. जागतिक पदार्थ बनवण्यासाठी नाचणी, ज्वारी, कोडो, राजगिरा यांसारखे स्थानिक पातळीवर पिकणा-या धान्याचे पदार्थ याठिकाणी मिळत असल्याने शेतक-यांचीदेखील उन्नती साधले जात असल्याचे समाधान डॉ. सोनम यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading