fbpx

भारतातील प्रमुख नृत्यशैलींचा एकत्रित रंगमंचीय नृत्याविष्कार

पुणे: ओडीसाचे पारंपरीक ‘ओडीसी’ नृत्य…उत्तर भारतातील शास्त्रीय नृत्य ‘कथक’…दक्षिण भारतीय नृत्य शैली ‘भरतनाट्यम’ या नृत्यशैलींसोबतच आसामच्या माती आखाड्यात जोपासली गेलेली ५०० वर्षे जुनी सत्रीय नृत्य परंपरा…या भारतातील प्रमुख नृत्यशैलींचा देखणा नृत्याविष्कार एकत्रित पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
निमित्त होते, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत संगीत नाटक अकादमीचे सत्रीय केंद्र गुवाहाटी यांच्यावतीने आणि भारती विद्यापीठ अधिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि असोमि यांच्या सहयोगाने आयोजित दीक्षा प्रवाह या कार्यक्रमाचे. कोथरुडमधील बालशिक्षण सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल ६० कलाकारांनी सत्रिय संगीत आणि नृत्यशैलीचे सादरीकरण केले. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार विजेते नरेन चंद्र बरुआ , संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या अनिता शर्मा, सत्रिय संगीतातील दिग्गज भास्कर ज्योती ओझा, संगीत नाटक अकादमीचे सहाय्यक संचालक राजू दास, पं.मनिषा साठे, प्रा.शारंगधर साठे, डाॅ. देविका बोरठाकूर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सत्रीय संगीताचे सादरीकरण करण्यात आले. वाद्य संवाद या सादरीकरणात मंत्रमुग्ध करणारे संगीत आणि गायनाने उपस्थितींना भारताच्या समृद्ध सांस्कृतीक परंपरेची अनुभूती दिली. सत्रीय संगीतातील वाद्याच्या जुगलबंदीला उपस्थितींनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कृष्णाय वासुदेवाय…या श्लोकाच्या सादरीकरणात कृष्णाच्या लीला सादर करण्यात आल्या.
यानंतर नरेन बरुआ यांच्या बहार आणि अनिता शर्मा यांच्या या अप्रतिम सादरीकरणाने उपस्थित रसिक थक्क झाले. सुंदर हस्तमुद्रा, तालबद्ध पदन्यास आणि त्याला भक्तीची जोड याद्वारे सत्रीय नृत्याचे सौंदर्य अतिशय देखण्या पद्धतीने कलाकारांनी उलगडले.
प्रा. शारंगधर साठे म्हणाले, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय, संगीत नाटक अकादमीच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने आणि असोमी च्या सहकार्याने भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्यावतीने सत्रीय नृत्य आणि संगीताची १६ दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत गुरुंकडून जे ज्ञान प्राप्त झाले त्याचे सादरीकरण यावेळी विद्यार्थ्यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: