fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या ‘कमवा व शिका’ योजनेसाठी सहकार्याचे आवाहन

पुणे : ग्रामीण भागातून पुण्यात उच्च शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आधार देणाऱ्या विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये ‘कमवा व शिका’ योजना राबविण्यात येते. समितीमध्ये स्वावलंबन व अर्थार्जनासाठी कमवा व शिका ही योजना अनिवार्य आहे. या योजनेत काम केल्याने श्रमसंस्कार लक्षात येऊन पैशाचे मोल कळते, संभाषण कौशल्य, कामाची जबाबदारी, स्वावलंबन, व्यवहाराचे अनौपचारिक शिक्षण मिळते. रोज किमान एक ते दोन तास काम केल्यामुळे त्यांचा महिन्याचा खर्च भागण्यास व पालकांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होते.

कार्यालयीन मदत, लेखनिक, डाटा एंट्री (संगणक), संगणकावरील कामे, बँकांची कामे, शिकवणी, रिसेप्शनिस्ट, वर्तमानपत्र, पुस्तके वाचन करुन दाखवणे, वृध्दसेवा, फिरावयास जाण्यास सोबत, घरगुती कामात मदत, बागकाम, पर्यावरण संस्थेच्या वृक्षारोपण मोहिमेतील कामे अशी नियमित स्वरुपाची कामे तर हंगामी स्वरुपाच्या कामांमध्ये पत्रके वाटप, इव्हेंट मॅनेजमेंट, उत्तरपत्रिका तपासणी अशी कामे समाविष्ट आहेत, या योजनेत ही कामे असावीत.

आपण स्वत: विद्यार्थ्याचे पालक आहोत असे समजून त्याला काम सांगावे. विद्यार्थ्याची नोकरी न समजता त्यांच्या शिक्षणात त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात आपला वाटा असावा, अशी इच्छा आहे, त्यादृष्टीने त्याला सूचना व मार्गदर्शन करावे. आपल्याकडे काम करताना मिळालेल्या अनुभवांचा व संस्कारांचा विद्यार्थ्याला त्याच्या पुढील आयुष्यात लाभ व्हावा, अशीही समितीची इच्छा आहे.

आपल्याकडील उपलब्ध काम करण्याची संधी विद्यार्थी-विद्यार्थिनींना देऊन या योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते सायं. ४ या वेळेत संस्थेच्या ११८२/१/४ शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे-४११००५ या पत्त्यावर कार्यालयात प्रत्यक्ष भेटावे किंवा ९४०४८५५५३० किंवा ०२०-२५५३३६३१ दूरध्वनीवरून संपर्क साधावा. www.samiti.org या संकेतस्थळावरही सविस्तर माहिती उपलब्ध आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading