fbpx

महालक्ष्मी मंदिरात सोमवारपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवाचा प्रारंभ सोमवार, दिनांक २६ सप्टेंबर पासून होणार आहे. दिनांक २६ सप्टेंबर ते ५ आॅक्टोबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच देवी जागर नृत्य, महिला पोलीस व महिला पत्रकार सन्मान, परिचारिका गौरव सोहळा, कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा नवरात्र उत्सव महालक्ष्मी मंदिरात साजरा होणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.

सोमवारी (दि.२६) सकाळी ९ ते ११.३० यावेळेत अ‍ॅड. एस. के. जैन यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तसेच, सायंकाळी ६.३० वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते होईल. याशिवाय दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत.

मंगळवारी (दि.२७) दुपारी २ वाजता केशव महिलांच्या ग्रुपतर्फे श्रीसूक्त व विष्णू सहस्त्रनाम पाठ होणार आहे. तर, सायंकाळी ७ वाजता प्रिया डिसा यांचा देवी जागर नृत्याचा कार्यक्रम मंदिरात होईल. बुधवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजता महिला पोलिसांचा सन्मान सोहळा व आरती होईल.

गुरुवारी (दि.२९) महिला पत्रकारांचा गौरव व त्यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता आरती होणार आहे. शुक्रवारी (दि.३०) विश्वकर्मा विद्यालयातर्फे दुपारी २ वाजता स्वरांजली कार्यक्रम होईल. तसेच सायंकाळी ५ वाजता कमला नेहरू हॉस्पिटलमधील परिचारिकांचा सन्मान सोहळा होणार आहे. शनिवारी (दि.१) सायंकाळी ५ वाजता देवदासींच्या मुलींचे कन्यापूजन हा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध सामाजिक संस्थेतील मुलींचे कन्यापूजन होईल. रविवारी (दि.२) सायंकाळी ५ वाजता पुणे शहरातील विविध शाळांतील शिक्षकांचा भोंडला होणार आहे.

सोमवारी (दि.३) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिनाचा गौरव सोहळा नारी तू नारायणी या कार्यक्रमात होईल. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी (दि.४) दुपारी ४ वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान भारतीय सैन्यदलातील दिव्यांग सैनिकांच्या हस्ते होणार आहे. दस-यानिमित्त बुधवारी (दि.५) श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. सायंकाळी हळदी कुंकू व ओटीचा कार्यक्रम, आर्ट आॅफ लिव्हिंग तर्फे भजनसंध्या आणि रात्री ९ वाजता गरबा नृत्य होईल.

उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत. भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. मंदिराच्या ५०० मीटर परिघातील सर्व भक्तांना यामुळे विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच मंदिर व आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटिव्ही कॅमेरे आणि २५ हून अधिक सुरक्षारक्षक असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून पुणेकरांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: