न्यायव्यवस्थेने दसरा मेळावा घेण्याची परवानगी देऊन शिवसेनेला न्याय दिला -विरोधी पक्ष नेते अजित पवार
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी देण्याचा मोठा निकाल दिला आहे. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, शिवाजी पार्कच्या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. उद्धव ठाकरे हेच माझ्यानंतर शिवसेनाप्रमुख असतील, असेही बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. त्यामुळे आज न्यायव्यवस्थेने सभा घेण्याची परवानगी देऊन शिवसेनेला न्याय दिला आहे. याचे मला समाधान आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल शरद पवार यांच्यावर आरोप होत आहे. त्याबद्दल अजित पवार म्हणाले, ‘१५जुलैला राज्याचे मुख्य सचिव मनु श्रीवास्तव यांनी हायपॉवर कमिटी घेऊन वेदंताला जास्त सुविधा द्याव्या लागतील .असे सांगितले होते. तरीही पवार साहेबांबद्दल बोलताना बिनबुडाचे आरोप होत आहेत, असे अजित पवार म्हणाले.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना देशभरातून अटक केली आहे. देशाला सुरक्षेसाठी अखंडतेसाठी यंत्रणा काम करत असताना त्याला कोणीही विरोध करू नये. सुरक्षा यंत्रणांना गंभीर माहिती मिळाली असल्याने त्यांनी देशभरात कारवाई केली आहे, असे पवार यांनी सांगितले.
प्रताप सरनाईक यांना क्लिनचीट मिळाली त्याबद्दल पवार म्हणाले, ‘लोक काय दुधखुळी नाहीत, मांजर डोळे मिटून दूध पीत आहे असा हा प्रकार नाही. जनता खूप हुशार आहे, त्यांना कळते. आम्ही यावर कशाला बोलावे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले मंत्रीच आम्हाला शांत झोप लागले, आम्हाला काळजी नाही असे सांगत आहेत, असा टोला नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांना लगावला.