fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

महाराष्ट्र शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष शासनाने साजरे करावे – शाहीर हेमंतराजे मावळे

पुणे : महाराष्ट्राची शाहिरी व लोककला संपूर्ण देशभर पोहोचविणारे, महाराष्ट्र राज्य निर्मीतीच्या घोषणेच्यावेळी महाराष्ट्र गीताचे गायन करणारे महाराष्ट्र शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्षे ३ सप्टेंबर पासून सुरु झाले आहे. हे वर्ष महाराष्ट्र शासनाने शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करावे, असे आवाहन आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार जालन्याचे युवा लोकगायक व युवाशाहीर रामानंद आप्पासाहेब उगले यांना गंज पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी कवयित्री व बालसाहित्यकार डॉ.संगीता बर्वे, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, प्रा.संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पुरस्काराचे यंदा २३ वे वर्ष असून मानाचा शाहिरी फेटा, मोत्याचा शिरपेच, स्मृतीचिन्ह आणि रुपये ११ हजार असे स्वरुप होते.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरुन शाहीर साबळे यांनी महाराष्ट्र की लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोककला देशभर पोहोचविली. शाहीर साबळे म्हणजे शाहिरीतील गंधर्व आहेत. केंद्र सरकारने त्यांना पद्म पुरस्काराने गौरविले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने मावळे यांनी शासनाला आवाहन केले असून सर्व शाहीर महाराष्ट्र शासनाच्या सोबत असतील, असेही त्यांनी सांगितले.

डॉ.संगीता बर्वे म्हणाल्या, घराचे बंद दरवाजे ही पुण्याची संस्कृती होत चालली आहे. मात्र, शहराच्या पूर्व भागात अजूनही लोककलेसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मावळे यांच्यासारखी कुटुंबे माणसातील संवाद अबाधित ठेवत आहेत. शाहिरी व पोवाडा प्रसाराचे मोठे काम सुरु असून हा आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे चालवित तरुणांपर्यंत पोहोचविण्याकरिता आपण पुढे येण्याची आवश्यकता आहे.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, सामाजिक एकात्मता पसरविण्याचे काम शाहिरांनी केले. दारिद्रय, उपासमार सहन करीत अनेक अडचणींना तोंड देत पोवाडयाद्वारे शाहिरांनी सामाजिक भाष्य केले. वीराचे, शौर्याचे, पराक्रमाचे, बुद्धीचे, सामर्थ्याचे गुणगान देखील पोवाडयातून शाहिरांनी गायले. त्यामुळे आपली संस्कृती व पोवाडयासारख्या उत्तम कला आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. युवा लोकगायक रामानंद उगले व सहका-यांचा महाराष्ट्राची लोकगाणी हा कार्यक्रम देखील झाला. अक्षदा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. प्रिती यादव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading