सुर संगीताने फुलले प्रतिभावंतांचे ‘गीत चांदण्याचे’
पुणे : तरुण आहे रात्र अजून…सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…चांदण्यात फिरताना माझा धरलास हात… सावर रे…भाव भोळ्या भक्तीची…शुक्रतारा मंदवारा अशा एकाहून एक गीतांमधून मराठी साहित्य आणि संगीत सृष्टीमध्ये मोलाची भर टाकणाऱ्या प्रतिभावंत कवी मंगेश पाडगावकर आणि गझलसम्राट सुरेश भट यांची गीते बहारदार सादर करून गायक आणि वादकांनी सुमधुर गीत चांदण्याचे मैफल रंगविली.
नाद मुद्रा निर्मित आणि संकल्प थिएटर आणि कल्चरल अकादमी मुंबई यांच्या वतीने ‘ गीत चांदण्याचे ‘ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात गायक आणि वादकांनी आपल्या सुमधुर सादरीकरणाने कविवर्य मंगेश पाडगावकर आणि गझल सम्राट सुरेश भट यांच्या बहारदार रचना पुन्हा एकदा जिवंत केल्या. गायक प्रणव तळवळकर, सावनी सावरकर, रेणू बोरकर, रेवती सुपेकर, केतकी देशपांडे यांनी गीतांना सुमधुर आवाज दिला. तर भारत ढोरे, आनंद खळदकर, वासुदेव बापट, नरेंद्र चिपळूणकर यांच्या साथ संगतीने मैफिलीत रंगत आणली.
आयुष्यावर भाष्य करणारे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या गीताने मैफिलीची सुरुवात झाली. त्यानंतर रेणू बोरकर यांनी श्रावणात घननिळा बरसला या गीतातून श्रावणाचे रंग उधळले. यानंतर प्रणव तडवळकर आणि रेवती सुपेकर यांनी हात तुझा हातात हे गीत सादर केले.
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या बरोबरच सुरेश भट यांच्या गीतांनीही मैफल अतिशय रंगतदार झाली. यामध्ये गायकांनी तरुण आहे रात्र अजुनी, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, मेंदीच्या पायावर, लाभले आम्हास भाग्य, मी मज हरवून बसले रे, केव्हा तरी पहाटे अशी गीते सादर करून रसिकांना मराठी भाषा आणि संगीताच्या श्रीमंतीचा पुन्हा प्रत्यय करून दिला. ऋचा थत्ते यांनी निवेदन केले.
