पुणे : क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे आयोजित २१ व्या ‘मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’ला शुक्रवारी (दि. १६ सप्टेंबर) उत्साहात सुरवात झाली. रेंज हिल्स येथील कृषी महाविद्यालय मैदान येथे आयोजित या तीन दिवसीय प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त राहुल महिवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी क्रेडाई नॅशनल’चे अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे,उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, मनीष जैन, आदित्य जावडेकर, विनोद चांदवानी, सचिव अरविंद जैन, महासंचालक डी के अभ्यंकर, प्रदर्शनाच्या आयोजन समितीचे मुख्य समन्वयक जे. पी. श्रॉफ हे उपस्थित होते. या प्रदर्शनात नागरिकांना क्रेडाई पुणे मेट्रोचे सभासद असलेले पुण्यातील ६० हून अधिक नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या सुमारे १००० रेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांची माहिती उपलब्ध होत आहे. किफायतशीर ते आलिशान अशा सर्व श्रेणीतील सदनिकांचे विविध पर्यायांचा यामध्ये समावेश आहे.
यावेळी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल म्हणाले, “ क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे आयोजित हा प्रकल्प एक पथदर्शी उपक्रम आहे. क्रेडाई’ने पुण्यातील बांधकाम क्षेत्राला योग्य गती देण्याचे काम केले आहे. पीएमआरडीए’तर्फे पुणे महानगर क्षेत्रात विविध गृहनिर्माण प्रकल्प राबविले जात आहेत. नागरिकांना उत्तम दर्जाचे आणि राहण्यायोग्य घरे देण्याचा आमचा मांस असून, त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांचे सहकार्य महत्वाचे ठरणार आहे.’’
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग म्हणाले, “ क्रेडाई’तर्फे हा एक अतिशय चांगला उपक्रम राबविला जात असून, प्रदर्शनात सहभागी झालेल्या नागरिकांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. करोनानंतर जिथे बांधकाम क्षेत्रात मागणी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे, अशा परिस्थितीत हा उपक्रम बांधकाम व्यावसायिक, वित्तसंस्था तसेच खरेदीदार या तीनही घटकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.’’
क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे म्हणाले, “ करोनानंतर पहिल्यांदाच हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, इतक्या मोठ्या स्तरावर हे प्रदर्शन भरत आहे, हे पाहून आनंद होत आहे. या प्रदर्शनामुळे पुण्यात घर घेऊ इच्छीणाऱ्या नागरिकांना चांगले मार्गदर्शन तर उपलब्ध होईल, शिवाय अशा नागरीकांची माहिती संकलित करण्यास हे प्रदर्शन उपयुक्त ठरते.’’
तब्बल ५,६७५ स्क्वेअर मीटर परिसरात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात १३ बँक’नी सहभाग नोंदविला असून, त्यामध्ये आयसीआयसीआय, एचडीएफसी होम लोन, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदा यांचा समावेश आहे. तसेच बांधकाम क्षेत्रातील बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय), आयजीबीसी आणि पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीरिंग आणि रीसर्च फौंडेशन (पीसीईआरएफ) या तीन संस्था सहभागी आहेत. नागरिकांना हे प्रदर्शन १८ सप्टेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पाहता येणार आहे.
Related