fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

सामाजिक विषमतेविरुद्ध लढण्यासाठी दलित पँथर पुन्हा नव्याने उभी राहावी – डॉ. भालचंद्र मुणगेकर

पुणे: एकविसाव्या शतकाचे प्रश्न आणि पेच वेगळे असून त्या अनुषंगाने दलित पँथरची पुनर्मांडणी करत सामाजिक विषमतेविरुद्ध लढण्यासाठी दलित पँथर पुन्हा नव्याने उभी राहावी असे मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, समाजशास्त्र विभाग आणि साधना साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ दालित पँथर : सुवर्ण महोत्सव’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव (ऑनलाईन) यांच्या भाषणाने झाले. यावेळी उद्घाटन सत्रात ज्येष्ठ लेखक डॉ.जनार्दन वाघमारे यांचे बीजभाषण (ऑनलाईन), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासानाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.श्रुती तांबे, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ आदी यावेळी उपस्थित होते.

चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात ‘दलित पँथर आणि आम्ही ‘ या विषयावर ज्येष्ठ अभ्यासक व माजी विधानपरिषद सदस्य जयदेव गायकवाड, दलित पँथरचे नेते, सुरेश सावंत, अर्जुन डांगळे आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ‘ दलित पँथरचे योगदान: चर्चा आणि चिकित्सा या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक व चळवळीचे अभ्यासक डॉ. शरणकुमार लिंबाळे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे व मधू कांबळे यांनी विचार व्यक्त केले. तर या सत्राचे अध्यक्षपद डॉ.नागनाथ कोतापल्ले यांनी भूषवले.

डॉ.भालचंद्र मुणगेकर म्हणाले, दलित पँथरमध्ये नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांच्यातील मतभिन्नतेने संघटन विस्कळीत होणे स्वाभाविक होते. आजच्या सामाजिक विषमतेविरोधात चळवळ पुन्हा उभी करण्यासाठी जयदेव गायकवाड यांनी पुढाकार घ्यावा. मी कार्यकर्ता होण्यास तयार आहे असेही मुणगेकर यावेळी म्हणाले.

डॉ. बाबा आढाव म्हणाले, चळवळीच्या सुरवातीच्या काळापासूनच मी कायमच याचा भाग राहिलेलो आहे. परंतु हल्ली या चळवळी फारशा राहिल्या नाही असे मला वाटते. या चळवळी पुन्हा नव्याने उभ्या राहायला हव्यात आणि यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात यात सहभागी होणे गरजेचे आहे.

डॉ नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, दलित पँथरने लेखकांची चळवळ उभी केली व स्त्री मुक्तीच्या दिशेने पाऊल टाकले. आजच्या काळातील प्रश्न व येणाऱ्या काळातील प्रश्न खूप कठीण आहेत. युवांना माझं आवाहन आहे की सर्वांनी एकत्र येत अशा चळवळी पुन्हा उभ्या कराव्यात.

प्रफुल्ल पवार म्हणाले, ज्यावेळी एखाद्या कामात नैसर्गिक नाही तर कृत्रिमपणे अडसर निर्माण केला जातो त्या ठिकाणी विषमता निर्माण होते. ही प्रवृत्ती जरी निरंतर दिसते तसेच याचा लढाही निरंतर असणे गरजेचे आहे. दलित पँथर हे काम निरंतरपणे करताना दिसत आहे.

डॉ. जनार्दन वाघमारे म्हणाले, दलित पँथरच्या या चळवळीत दलित साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. दलित समाजाला आत्मभान आणि अस्मिता देण्याचे काम चळवळीने केले. आंबेडकरांचे विचार हेच दलित पँथरचे प्रेरणास्थान आहे. भविष्यात या चळवळीला बळ देण्याची गरज आहे.

माजी आमदार जयदेव गायकवाड दलित पँथरच्या चळवळीत असताना नामदेव ढसाळ यांच्यासोबत मिळून आम्ही दलितांना शेत-जमीन मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले व त्या मिळवून दिल्या. त्या काळात संघटनेने अत्यंत आक्रमकपणे प्रस्थापितांना आणि व्यवस्थेला आव्हान देत स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते. यावेळी त्यांनी काही चळवळीतील रोमांचक घटनांचा मागोवा घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading