Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

बक्षीस मिळाले की स्पर्धक शेफारून जातात : सौरभ गोखले

पुणे : स्पर्धेत सहभागी होणे म्हणजे केवळ बक्षीस मिळविणे असा उद्देश नसावा तर त्या स्पर्धेची संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे, अशी शिकवण आम्हाला आमच्या गुरूंकडून मिळाली. स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर बक्षिसे किती मिळतात याकडेच आता जास्त लक्ष दिले जात आहे. एखादे बक्षीस मिळाले की स्पर्धक शेफारून जातात, अशी टीका युवा अभिनेते सौरभ गोखले यांनी केली.

विजय पटवर्धन फाउंडेशनतर्फे विनोदमूर्ती प्रकाश इनामदार करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे भरत नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेला आज सुरुवात झाली. स्पर्धेचे यंदाचे पहिले वर्ष आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून गोखले बोलत होते. या प्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, फाउंडेशनच्या अध्यक्षा वृषाली पटवर्धन, विजय पटवर्धन, आदित्य मोडक, प्रविण वानखेडे, अभिनेते शेखर भागवत, श्रेयस दीक्षित रंगमंचावर होते. स्पर्धेत राज्यातील 24 संघ सहभागी झाले असून स्पर्धा दि. 16 सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत.

गोखले पुढे म्हणाले, आयोजक जेव्हा स्पर्धेचे आयोजन करतो तेव्हा सुरुवातींच्या क्षणांपासून त्याचे साक्षिदार होणे जास्त महत्त्वाचे असते. स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर शिकायला मिळणाऱ्या गोष्टी या स्पर्धकासाठी बक्षीसच असतात. केवळ बक्षीसाठी स्पर्धेत सहभागी होणे ही गोष्ट क्लेषदायक असून कलाकारांच्या दृष्टीने धोकादायक आहे.

विजय पटवर्धन फाउंडेशनत स्पर्धेच्या माध्यमातून कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून मेघराज राजेभोसले यांनी सहभागी कलाकारांना शुभेच्छा दिल्या.

अडचणीच्या काळात विजय पटवर्धन फाउंडेशनने कलाकारांना मदतीचा हात दिला होता. दिवंगत कलावंतांच्या नावे पुरस्कार देऊन त्यांच्या स्मृती कायम ठेवण्याचा फाउंडेशनचा उपक्रम स्तुत्य असल्याचे जयमाला इनामदार म्हणाल्या.
सौरभ गोखले यांचा सत्कार मेघराज राजेभोसले यांनी मानपत्र देऊन केला. विजय पटवर्धन यांनी संस्थेच्या दोन वर्षांतील सामाजिक कार्याची माहिती देऊन स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशुतोष नेर्लेकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading