विसर्जन मिरवणुकीतील आवाजाने पुणेकरांच्या कानठाळ्या बसल्या; ध्वनी प्रदूषणाचा नवा उच्चांक
पुणे : दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात साजरी होणारी यंदाची विसर्जन मिरवणूक पुणेकरांसाठी कानठळ्या बसवणारी ठरली. विसर्जन मिरवणुकीतील गेल्या आठ वर्षांतील ध्वनी पातळीचा तब्बल १०५.२ डेसिबल्स इतका उच्चांक यंदा नोंदवला गेला. ध्वनी पातळीच्या नियमांतील मर्यादेपेक्षा दुप्पट ते तिप्पट अधिक पातळी नोंदवली गेली.
अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे’च्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणेच यंदाही विसर्जन मिरवणुकी दरम्यान लक्ष्मी रस्त्यावरील दहा प्रमुख चौकांतील ध्वनी पातळीची मोजणी केली. त्यातून ही माहिती समोर आली. यापूर्वी २०१३ मध्ये सरासरी ध्वनी पातळी १०९.३ डेसिबल्स नोंदवण्यात आली होती. त्यानंतर गेल्या बावीस वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक सरासरी ध्वनी पातळी यंदा नोंदवली गेली. यंदा सर्वाधिक पातळी आज सकाळी सकाळी ८ वाजेच्या सुमारास खंडुजी बाबा चौकात तब्बल १२८.५ डेसिबल्स इतकी नोंदवण्यात आली. नियमांतील मर्यादेपेक्षा हे प्रमाण जवळपास दुप्पट होती. सर्वात कमी ध्वनी पातळी ही काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास खंडुजी बाबा चौकात ६४ डेसिबल्स इतकी नोंदवण्यात आली.
शुक्रवारी सकाळी १२ वाजेपासून ते शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कालावधीतील आवाजाची मोजणी यात करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी ८ वाजेपर्यंत ध्वनी पातळी सरासरी १०० डेसिबल्सपर्यंत होती. त्यानंतर मात्र आवाजाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली. रात्री ८ ते १२ या काळात आवाजाची सरासरी पातळी ११० डेसिबल्स इतकी होती. रात्री १२ वाजेनंतर डीजेंचा दणदणाट थांबणे अपेक्षित असले तरी आवाजाची पातळी चढतीच राहिली. रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ११३.१, पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत १०७.५ आणि सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ११३.८ सरासरी ध्वनी पातळी नोंदवण्यात आली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीनुसार आवाजाची मर्यादा नागरी वस्तीत दिवसा ५५ व रात्री ४५, व्यापारी वस्तीत दिवसा ६५ व रात्री ५५ आणि शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्री ४० डेसिबल्स इतकी असणे अपेक्षित आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत या मर्यादांचे सर्रास उल्लंघन झाले. मर्यादेपेक्षा तब्बल दुप्पट ते तिप्पट प्रमाणावर ध्वनी पातळी पोहचली होती. ८० डेसिबल्सपर्यंतचा आवाज मानवी कानांना सहन होऊ शकतो. त्यापुढील आवाजाची धोकादायक मानली जाते. तर, १०० ते ११० डेसिबल्सपुढील आवाजाची पातळी अति धोकादायक समजली जाते. यंदाच्या मिरवणुकीतील ध्वनी पातळी सातत्याने अति धोकादायक या श्रेणीत होती.असे या पाहणीचे प्रमुख डॉ. महेश शिंदीकर यांनी सांगितले.
गेल्या आठ वर्षातील विसर्जन मिरवणुकीतील
सरासर ध्वनी पातळी
बेलबाग चौक – १०२.८
गणपती चौक – १०४.९
लिंबराज महाराज चौक – १०३.२
कुंटे चौक – ११३.१
उंबऱ्या गणपती चौक – ११२.६
गोखले चौक – १०१.६
शेडगे चौक – १०२.४
होळकर चौक – १०३.८
टिळक चौक – १०५.३
खंडूजी बाबा चौक – १०२.२
२०१३ – १०९.३
२०१४ – ९६.३
२०१५ – ९६.६
२०१६ – ९२.६
२०१७ – ९०.९
२०१८ – ९०.४
२०१९ – ८६.२
२०२० – ५९.८
२०२१ – ५९.८
२०२२ – १०५.२
फोटो- प्रातिनिधीक
