‘अमोघ त्रिशक्ती नाग’ रथातून निघाली अखिल मंडई मंंडळाच्या शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक
अखिल मंडई मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १२९ वे वर्ष आहे. मंडळाच्या वतीने अमोघ त्रिशक्ती नाग रथ यंदा साकारण्यात आला होता. बेलबाग चौकात सकाळी ६.३० वाजता रथ आल्यानंतर उपस्थितांनी गणपती बाप्पा मोरया चा उत्स्फूर्त जयघोष केला. रथावरील ब्रम्हा, विष्णू व महेशाच्या त्रिमूर्ती गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होत्या नागाच्या वेटोळ्यामध्ये शारदा गजानन विराजमान झाले होते. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या शारदा गजाननाची देखणी मूर्ती मोबाईल मध्ये टिपत उपस्थितांनी गणरायाला निरोप दिला.
२२ फूट लांब व १४ फूट रुंद असलेल्या या विसर्जन रथाची उंची ३२ फूट होती. शेषनाग हा १९ फुट लांब तर ११ फुटी त्रिमूर्ती साकारण्यात आली होती.. हायड्रोलिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे ३० फुटांचा रथ ११ फुटांनी कमी होऊन १९ फूट होऊन रथ मेट्रोच्या पूलाखालून सहजरीत्या पार झाला.
